Sun, Jul 21, 2019 05:51होमपेज › Pune › पुणे जिल्ह्यातील १६५ शेतकर्‍यांची आत्महत्या

पुणे जिल्ह्यातील १६५ शेतकर्‍यांची आत्महत्या

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी

वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे नेहमीच विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न चर्चेत असतो. मराठवाड्याची स्थिती ही त्यापेक्षा वेगळी नाही. मात्र, बागायतपट्टा  म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या 14 वर्षांत 165 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोेंद सरकार दप्तरी आहे. दरम्यान, शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार्‍या अनुदानासाठी 89 प्रस्ताव पात्र तर, 74 प्रस्ताव अपात्र ठरली आहेत. एक प्रस्ताव निवड समितीसमोर छाननीसाठी सादर करण्यात आला आहे.

काही वर्षांपासून वातावरणात होणार्‍या बदलांचा थेट शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. विदर्भातील शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे प्रमाण हे हळूहळू मराठवाड्यात पसरले. पश्‍चिम माहाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करीत नाही, असा समज होता. 

परंतु, गेल्या 14 वर्षांचा इतिहास पाहिल्यास विविध कारणांनी  पुणे जिल्ह्यातील 165 शेतकर्‍यांनी मरणाला कवटाळले. त्याता 2006 मध्ये सर्वाधिक 26 आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर 2017 मध्ये 22 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दप्तरी आहे. 2015 आणि 16 मध्ये अनुक्रमे 19 व 18 शेतकर्‍यांनी जीवन संपवलेे. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून तालुका प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या 165 प्रस्तावांपैकी 89 प्रस्ताव पात्र ठरले आहेत. 74 प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत.

1 प्रस्तावावर अद्याप निर्णय होणे बाकी आहे. अपात्र करण्यात आलेली प्रकरणे निकषात बसत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रस्ताव मंजूर झाल्यास वारसदाराला एक लाखाची मदत मिळते. त्यापैकी 70 हजार ठेव स्वरूपात तर 30 हजार रोख दिले जातात. पुण्यासारख्या सधन जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ही बाब चिंताजनक असून, आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे.