Tue, Apr 23, 2019 19:51होमपेज › Pune › माजी पोलिस अधीक्षकाचीच १६ लाखांना फसवणूक

माजी पोलिस अधीक्षकाचीच १६ लाखांना फसवणूक

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

माजी पोलिस अधीक्षकाचीच ब्रोकर्स संस्थेच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याच्या आमिषाने तब्बल 16 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी आदित्यराजे यशवंत देशमुख (रा. जी. 104, प्रोफाईल सोसायटी, वाकड) याच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यासंदर्भात माजी पोलिस अधीक्षक (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे माजी पोलिस अधीक्षक असून, ते कोल्हापूर राज्य राखीव पोलिस  दल गट क्रमांक 16 (आरपीएफ) येथून तीन वषार्र्ंपूर्वी निवृत्त झाले आहेत. ते सध्या नर्‍हे परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान ते मुंबईत  नोकरीस असताना त्यांची देशमुख याच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी त्याने शेअर बाजाराचे काम करत असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानंतर देशमुख हा फिर्यादींच्या नर्‍हे येथील घरी आला.

त्याने बोनान्झा कम्युडीटी ब्रोकर्समध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याला 5 ते 10 टक्के परतावा मिळेल असे सांगितले. त्यांना विश्‍वासात घेतले. त्यानुसार फिर्यादींकडून वेळोवेळी धनादेश व रोख स्वरूपात एकूण 16 लाख 10 हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पैशांबाबत विचारपूस केली. त्यावेळी थोड्या दिवसात पैसे जमा होतील असे देशमुख याने सांगितले. मात्र, पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी जंगली महाराज रोडवरील बोनान्झा कम्युडीटी ब्रोकर्स कंपनीत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना कंपनीत त्यांच्या नावाने खाते उघडण्यात आलेले नसल्याचे समजले. त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक गिरीश सोनवणे हे करत आहेत.