होमपेज › Pune › घरे नियमितीकरणासाठी प्राधिकरणाकडे १५०० अर्ज

घरे नियमितीकरणासाठी प्राधिकरणाकडे १५०० अर्ज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी अधिसूचनेतील अटी शिथिल करून घरे नियमित होण्याकरिता प्राधिकरणाकडे 1438 विनंती अर्ज जमा केले. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागाने 7 ऑक्टोबर रोजी घरे नियमित करण्यासाठी कायदा प्रसिद्ध केला. त्यानंतर 38 दिवसांनंतर म्हणजेच 17 नोव्हेंबरला प्राधिकरण प्रशासनाने अर्ज प्रक्रिया (हमीपत्र) जाहीर केली.

या क्‍लिष्ट पद्धतीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. याकरिता नागरिकांनी ‘विनंती अर्ज’ प्राधिकरण प्रशासनाकडे जमा करण्यास सुरुवात केली आहे. शास्तीकर, दंडात्मक रक्कम किती, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे नागरिकांमध्ये दंड किती,  याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे; तसेच जागेस दंड शुल्क किती, याबाबत प्राधिकरण नियोजन विभागाने त्वरित जाहीर खुलासा करावा अशी नागरिकांची मागणी आहे. या प्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले की, प्राधिकरणाने जाचक 3 अटी स्थगित ठेवून अर्ज जमा करण्याची प्रक्रिया राबवली, तर अनधिकृत बांधकामांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 15 मेपर्यंत आहे. 

तांत्रिक विकास आराखडा अवलोकन समितीनेही ‘चेंज अलायमेंट’ अहवाल राज्य शासनाकडे पाठविणे अत्यावश्यक आहे, म्हणजेच सर्व  30 मीटर एचसीएमटीआर रिंग रोडबाधित घरे नियमितीकरणासाठी पात्र ठरतील. अर्ज जमा करण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक शिवाजी इबितदार, सोनाली पाटील, शोभा मोरे, रजनी पाटील, माउली जगताप, नेहा चिघळीकर यांनी संयोजन केले.