होमपेज › Pune › बिल्डरकडून 150 कोटींची फसवणूक

बिल्डरकडून 150 कोटींची फसवणूक

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यातील बाणेर व बालेवाडी येथील दोन वेगवेगळ्या प्रकल्पांमधील फ्लॅटची विक्री करण्यासाठी, बनावट दस्तावेज तयार करून पुणे, नाशिक, जळगाव आणि धुळे येथील नागरिकांना गंडा घालणार्‍या बांधकाम व्यावसायिक दीपक यशवंत पाटील (51, रा. कोथरूड) याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.बनावट नकाशे व बनावट कागदपत्रे तयार करून फ्लॅटची विक्री आणि परत त्यावर कर्ज घेत; तसेच महापालिकेकडून बांधकाम सुरू करण्यासाठीचा बनावट दाखला (कमेन्समेंट सर्टिफिकेट) दाखवून, त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील चतुःशृंगी आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात पाटील याच्याविरोधात मोफा (महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट अ‍ॅक्ट)नुसार गुन्हे दाखल आहेत. पाटील याने धरती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून, बाणेर येथील ‘सिद्धांत कोर्टयार्ड’ प्रकल्पातील सात फ्लॅट विक्री करण्यासाठी रवींद्र कुमावत यांच्याकडून साडेतीन कोटी रुपये घेतले. त्यानंतर झालेल्या करारानुसार नोव्हेंबर 2014 पर्यंत कुमावत यांना फ्लॅटचा ताबा देणे बंधनकारक होते. मात्र त्यांना ताबा न मिळाल्याने कुमावत यांना लक्षात आल्यावर त्यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटकही केली होती. अशाच प्रकारे नौदल अधिकारी अतुल दिवेकर यांच्याकडून त्याने मौजे बालेवाडी येथील सिद्धांत हाईट्स या प्रकल्पातील फ्लॅटसाठी 59 लाख 50 हजार रुपये व रजिस्ट्रेशन, स्टँप ड्यूटी, लिगल फी यासाठी 7 लाख 65 हजार रुपये, असे एकूण 67 लाख 15 हजार रुपये घेतले होते; मात्र त्याच्या या प्रकल्पात सात मजल्यांच्या बांधकामाची परवानगी असताना, त्याने अकरा मजल्यांचे बांधकाम केले.

तसेच फिर्यादी दिवेकर यांना वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. त्यानंतर त्याने त्यांना वीस लाख रुपये परत केले. उर्वरित 47 लाख 15 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली. त्यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. बांधकाम व्यावसायिक हरिंदर पालसिंग आनंद (58, हडपसर) यांनाही बाणेर येथील सिद्धांत कोर्टयार्ड या प्रकल्पातील फ्लॅट देण्याचे त्याने आश्‍वासन दिले होते. त्यांच्याकडूनही 66 लाख 85 हजार 231 रुपये घेतले. मात्र, त्याने आनंद यांना फ्लॅटचा ताबा न देता, हा फ्लॅट वाटप पत्राद्वारे अमरदिप सिंग यांना देऊ केला. त्यापुढे जाऊन कडी करताना पाटील याने त्याच फ्लॅटवर योगिराज सहकारी पतसंस्था, बाणेर यांच्याकडे तारण ठेवून, त्यावर कर्जही घेतले. हा बनवाबनवीचा प्रकार समोर आल्यावर हरिंदर पालसिंग आनंद यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व त्यांच्या पथकाने दीपक पाटील याला अटक केली आहे.

Tags : Pune, 150, crore, fraud,  builder