Wed, Apr 24, 2019 11:56होमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’ गृहप्रकल्पात दीडशे कोटींचा भ्रष्टाचार

‘पंतप्रधान आवास’ गृहप्रकल्पात दीडशे कोटींचा भ्रष्टाचार

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:05AMपिंपरी : प्रतिनिधी 

पालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चर्‍होली, रावेत व बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्प बांधकामाचे दर दुप्पट आहेत. यात दीडशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. गरिबांच्या घरांच्या नावाखाली स्वत:ची घरे भरण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी सेनेचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पालिका शहरातील 10 ठिकाणी गृहप्रकल्प उभारणार आहे. चर्‍होली गृहप्रकल्पातील 1 हजार 442 सदनिकांसाठी 132 कोटी 50 लाख खर्च येणार आहे. बांधकामांसाठी ठेकेदाराला प्रतिस्केअर फूट 2 हजार 846 रुपये दर  दिला आहे. रावेत गृहप्रकल्पातील 934 सदनिकांसाठी 88 कोटी खर्च आहे. ठेकेदाराला प्रतिस्केअर फूट दर 2 हजार 977 रुपये आहे. तर, बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पातील 1 हजार 288 सदनिकांसाठी 123 कोटी 78 लाख खर्च आहे. त्याचा बांधकामांचा प्रतिस्केअर फूट दर 2 हजार 977 रुपये आहे.  शहरात बांधकामाचा बाजारभावाप्रमाणे प्रतिस्केअर फूट दर 1 हजार 400 ते 1 हजार 500 रुपये आहे. या दरात  उत्तम प्रकारे बांधकाम होऊ शकते. मात्र, चर्‍होली, रावेत व बोर्‍हाडेवाडी प्रकल्पांना प्रतिस्केअर फुटापेक्षा जास्त दर दिला गेला आहे. त्यामुळे या 3 प्रकल्पांत दीडशे कोटींचा  भ्रष्टाचार झाल्याचा  आरोप आ. चाबुकस्वार यांनी केला आहे. या तीनही प्रकल्पांची चौकशी करून निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, नगर विकासमंत्री रणजित पाटील यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली आहे.