Thu, Sep 19, 2019 03:29होमपेज › Pune › वाशीतून लंडनला १५ टन आंब्याची निर्यात (व्हिडिओ)

वाशीतून लंडनला १५ टन आंब्याची निर्यात (व्हिडिओ)

Published On: May 22 2019 9:12PM | Last Updated: May 22 2019 9:42PM
पुणे : प्रतिनिधी

वाशी येथील एका खासगी निर्यातदारामार्फत लंडन येथे समुद्रमार्गे सुमारे 15 टन आंबा निर्यातीच्या कंटेनरला मंगळवारी (दि.21) सायंकाळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यातून समुद्रमार्गे आंबा निर्यातीला अधिक गती देण्यासाठी अधिक प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. केशर व बदामी आंबा निर्यात करण्यात आला आहे. हे आंबे पूर्णतः कच्चे असून नियंत्रित वातावरणात निर्यात करण्यात आले आहेत. लंडनला पुढील 21 दिवसानंतर कंटनेर पोहोचण्याची अपेक्षा असल्याची माहिती पवार यांनी दिली.

पणन मंडळाचे तांत्रिक मार्गदर्शनाखाली आंब्यांवर हॉट वॉटर ट्रीटमेंट या सुविधेचा उपयोग करुन निर्यातदार असलेल्या बॉम्बे एक्सपोर्टर यांच्यामार्फत आंबा निर्यात करण्यात आली आहे. समुद्रामार्गे प्रथमच लंडन येथे आंबा निर्यात खासगी निर्यातदारांमार्फत होत आहे. आंबा निर्यातीस हिरवा झेंडा दाखविताना सुनिल पवार यांच्यासमवेत अशोक हांडे, संजय पानसरे, आंबा निर्यातदार आनंद शेजवळ, प्रितेश शेजवळ, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, अधिकारी सतिश वराडे, अभिमन्यू माने, भाजीपाला निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष एकराम हुसेन आदींसह व्यापारी वर्ग उपस्थित होते.

पवार म्हणाले की, विमान वाहतुकीद्वारे माल निर्यात करताना प्रति किलोस 150 ते 200 रुपये भाडे दयावे लागते. वाहतुकीचा खर्च मोठा राहतो आणि जागतिक बाजारात अन्य देशांच्या तुलनेत आपला शेतमाल महाग विकावा लागतो. स्पर्धेत आपण कमी पडतो आणि निर्यातीवर मर्यादा येतात. त्याला उत्तर दयायचे असेल तर आपला माल स्वस्त आणि दर्जेदार माल निर्यातीसाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून अपेडा संस्था, पणन मंडळाचे मार्गदर्शन घेवून समुद्रमार्गे शेतमाल निर्यातीला प्राधान्य देवून निर्यातीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मोटारभाडे दर कमी असून ही कार्यपध्दती विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्यामुळे हवाई वाहतुकीबरोबरच जहाजाद्वारे समुद्रमार्गे शेतमाल निर्यातीस प्राधान्य दिले जात आहे. सुमारे 15 टनांहून अधिक आंबा खासगी निर्यातदारांमार्फत निर्यात होत आहे.

आंबा निर्यातदार आनंद शेजवळ ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले की, गुजरातचा केशर आणि बदामी आंबा लंडनला निर्यात करण्यात येत आहे. विमान वाहतुकीद्वारे निर्यात करताना भाडे प्रति किलोस 130 रुपये खर्च येत आहे. तर जहाजाद्वारे समुद्रमार्गे निर्यात करताना किलोस 18 रुपये भाडे आलेले आहे. हा पथदर्शी कार्यक्रम असून त्याच्या यशस्वीतेनंतर समुद्रमार्गे निर्यातीला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 

685 टन आंबा निर्यात; 30 कोटींचे परकीय चलन...

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने 44 निर्यात सुविधा केंद्रे असून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेत जात असतो. नवी मुंबईतील वाशी येथील मंडळाच्या विकिरिण केंद्र, हॉट वॉटर ट्रीटमेंट आणि व्हेपर हीट ट्रीटमेंट या निर्यात सुविधा केंद्रे कार्यान्वित आहेत. या सुविधांमधून मोठ्या प्रमाणात आंबा, इतर फळे व भाजीपाला अमेरिका, युरोपियन देश, जपान, ऑस्ट्रेलिया या देशात निर्यात होत आहेत. शेतकरी समुहांसह खासगी निर्यातदारही या सुविधांचा लाभ घेतात. आज अखेर सुमारे 685 टन आंबा निर्यात झालेला आहे. या आंबा निर्यातीतून सुमारे ३० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळणे अपेक्षित आहे.