Fri, Apr 26, 2019 17:43होमपेज › Pune › चाकण जाळपोळ प्रकरणी १५ जणांना पोलिस कोठडी

चाकण जाळपोळ प्रकरणी १५ जणांना पोलिस कोठडी

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:52AMपुणे : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंसक मार्गाचा अवलंब करून जाळपोळ करून 8 ते दहा कोटींचे नुकसान करून सात पोलिस कर्मचार्‍यांना जखमी केल्याप्रकरणी 15 आंदोलनकर्त्यांना अटक करून गुरूवारी दुपारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी दिले आहेत. 
30 जुलै रोजी खेड तालुका बंद पुकारण्यात आला होता. यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे मोठ्या प्रमाणात वाहनाची तोडफोड आणि जाळपोळचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी 15 जणांना अटक करताना तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. 

प्रणिल उध्दव गावडे (23), आकाश मारूती कड (25), सचिन दिगंबर आमटे (27), साहेल रफीक इनामदार (19), विकास अंकुश नायकवडी (28), रोहिदास काळूराम धनवटे (19), समीर विलास कड (20), विशाल रमेश राक्षे (26), सत्यम दत्‍तात्रय कड (19), परमेश्वर राजाभाऊ शिंदे (22), अभिषेक उर्फ कुंदन विनोद शहा (19),  मनोज दौलत गिरी (23), सुर्यकांत बाळू भोसले (21),  आनंद दिनेश मांदळे (18), प्रसाद राजाराम खांडेभराड (18 सर्व रा. खेड तालुका) अशी पोलिस कोठडी झालेल्या 15 जणांची नावे आहेत. याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सरकारी वकील हेमंत मेंडकी व ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवाद केला की, सदर प्रकरण गंभीर असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या गुन्ह्याचे कट कारस्थान कुठे रचले आहे, त्याचा सूत्रधार कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता. त्यांना हत्यारे कोणी पुरवली व याप्रकरणी आणखी हत्यारे जप्त होऊ शकतात. त्यांनी पेट्रोल बाटल्या कोठून आणल्या याचा तपास कारवायचा आहे. त्यांचे इतर साथीदार कोण होते याबाबत प्रत्येकाकडे वैयक्तिक चौकशी कारवयाची आहे. पुणे बार असोसिएशनच्या वतीने मराठा आरक्षण करिता आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे केस मोफत लढण्याचे जाहीर केले होते.त्यानुसार बार असोसिएशनचे वतीने अ‍ॅड.सुभाष पवार यांच्यासह इतर वकीलांनी कोठडीस विरोध केला. यावेळी न्यायालयात वकिलांनी गर्दी केली होती त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. 

आम्हाला उपाशी ठेवले; आंदोलकांची न्यायालयाला माहिती

अटक आरोपींना न्याय दंडाधिकारी कटारे यांनी ‘तुम्हाला काही सांगायचे आहे का’, अशी विचारणा केली असता, त्यांनी बुधवारी रात्री बारा वाजता आम्हाला राहत्या घरातून चौकशी साठी घेऊन जातो असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात आम्हाला पोलीस ठाण्यात आणून आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत आमच्या कुटुंबियांनाही काही सांगितले नाही. पोलिसांनी आम्हाला न्यायालयात हजर करेपर्यंत पाणी अथवा जेवण दिले नाही; असे सांगतांना आंदोलकांना रडू कोसळले.