Mon, Jun 17, 2019 15:09होमपेज › Pune › तीन वर्षांत १४८ महिलांचा 'हकनाक' बळी!

तीन वर्षांत १४८ महिलांचा 'हकनाक' बळी!

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 1:19AMपुष्कराज दांडेकर

पुरोगामी व शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गेल्या तीन वर्षांत 148 महिला वंशाच्या दिव्याचा अट्टहास, हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या आहेत.

पुरोगामी चळवळी, स्त्री मुक्तीची चळवळ यांची सुरुवात पुणे शहरात झाली. स्त्री मुक्तीचे प्रणेते जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे आदी समाजसुधारकांमुळे  शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख झाली. असे असतानाही सध्याही काही ठिकाणी हुंडा पद्धती अस्तित्वात असल्याचे चित्र दिसते. वंशाच्या दिव्याचा अट्टहासही केला जातो. कायद्याने बंदी असूनही स्त्री भ्रूण हत्येच्या घटना वाढत आहेत.  त्या होऊ नयेत यासाठी सरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील करण्यात येते. मात्र, हुंडा पद्धतीमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

पतीकडून चारित्र्यावर संशय घेऊन दिला जाणारा त्रास, माहेरहून हुंडा आणण्यासाठी, लग्नात मानपान केले नाहीत, मुलगाच हवा  अशा वेगवेगळ्या कारणांनी राज्यभरात हजारो महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे.  पुण्यातही उच्चशिक्षित कुटुंबांमध्ये महिलांना लग्नानंतर पती, सासू, सासरे, नणंद, दीर यांच्याकडून हुंड्यासाठी त्रास दिल्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशा प्रकरणात आई-वडील, पोलिस आणि नातेवाईकांकडे तक्रारी केल्याने कुटुंबीय मध्यस्थी करतात. मात्र काही वेळा त्रासाला कंटाळलेल्या महिलांना  आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहात नाही.  मागील तीन वर्षांत यातूनच 148  महिलांचा हकनाक बळी गेला आहे. पावलोपावली अपमान करणे, टोचून बोलणे, मारहाण करण्याचे प्रकार घडतात.  

नोव्हेंबरमध्ये पतीकडून चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला जातो, या त्रासाला कंटाळून महिलेने खडकीतील हॅरिस पुलावरून मुलासह उडी मारून आत्महत्या केली होती, तर एका महिलेने अशाच त्रासामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ऑक्टोबरमध्ये मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पती व सासरच्या मंडळीकडून वारंवार होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दोन विवाहितांनी आत्महत्या केल्याच्या घटना पुण्यातील शिवाजीनगर तसेच कोंढवा परिसरात घडल्या.