Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Pune › अपहृत इंजिनिअरकडून १४ लाखांची खंडणी उकळली

अपहृत इंजिनिअरकडून १४ लाखांची खंडणी उकळली

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी

कार अडवून पिस्तुलाच्या धाकाने इंजिनिअर व त्याच्या चालकाचे अपहरण करून तब्बल 14 लाख 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. बी. टी. कवडे रोडवरील सोपानबाग येथून अपहरण करून कात्रज घाटात नेले आणि या ठिकाणी नातेवाइकांना बोलावूनपैसे उकळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपहरण झाल्यानंतर पैशांसाठी वाट पाहत थांबलेल्या आरोपींना बीट मार्शलने हटकले त्यावेळी आरोपींनी त्यांना दोन लाख 40 हजार रुपये देऊन सुटका केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे  पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. 

या प्रकरणी राहुल मनोहर कटकमवार (वय  37, रा. सिंहगड रोड) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटकमवार हे इंजिनिअर असून, ते एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. 22 मे रोजी सायंकाळी ते त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. बी. टी. कवडे रोडवरील सोपानबाग येथे आल्यानंतर अज्ञातांनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावली. तसेच  दुचाकीवरून आलेल्या चार व्यक्ती कारमध्ये जबरदस्तीने घुसल्या. पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी कारचा ताबा घेतला. तसेच कटकमवार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. त्यानंतर त्यांना नाना पेठ, सेव्हन लव्हज चौक आणि शहरात फिरवून कात्रज घाटात घेऊन गेले.

तेथे गेल्यानंतर कटकमवार यांना त्यांच्या नातेवाईकांना फोन लावण्यास सांगितले. तसेच पैसे गोळा करण्यास सांगितले. कार चालकामार्फत गोळा केलेले पैसे आणण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणाच्या नातेवाइकांकडून कटकमवार यांनी तब्बल 14 लाख 30 हजार रुपये आणले. ती रक्कम आरोपींना दिल्यानंतर त्यांनी 23 मे रोजी पहाटे कटकमवार यांना बावधन येथे सोडून दिले. त्यानंतर कटकमवार यांनी पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास युनिट पाचचे पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलिसांकडून विविध बाजूनी तपास करण्यात येत आहे.