Sat, Jul 20, 2019 09:00होमपेज › Pune › १४ लाखांचा गांजा जप्त

१४ लाखांचा गांजा जप्त

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 12:08AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सिंहगड रस्त्यावर शुक्रवारी केलेल्या कारवाईत महेश गोरख साळुंंके  या सराईत गुन्हेगाराकडून 14 लाख रुपये किंमतीचा 84 किलो गांजा जप्त केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पकडलेला गांजा आंध्रप्रदेशातून आणल्याची माहिती आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी महेश साळुंके हा त्याची हुंदाई अ‍ॅसेंट कार घेऊन रांका ज्वेलर्सच्या समोर राजाराम पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावर  संशयितरीत्या उभा होता. त्या वेळी त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी त्याच्या कारची तपासणी केली. त्या वेळी चार बारदाना पोत्यात एकूण 13 लाख 95 हजार रुपये किंमतीचा 84 किलो गांजा मिळून आला. त्याच्यावर गांजा बाळगल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.

तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. साळुंकेने हा गांजा आंध्रप्रदेशातून आणल्याचे समोर आले आहे. यापूर्वी चतु:शृंगी पोलिसांनी एका कारचालकाला पकडून त्याच्या गाडीतून 186 किलो गांजा जप्त केला होता. हा गांजादेखील आंध्रप्रदेशातून आणल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक व्ही. बी. जगताप करत आहेत. 

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, पोलिस कर्मचारी दिलीप जोशी, ज्ञानदेव घनवट, शिवाजी राहिगुडे, मोहन साळवी, गणेश देशपांडे, सुशील काकडे, प्रफुल्ल साबळे , मनोज साळुंके, रोहन चवरकर, विठ्ठल खिलारे, सचिन चंदन, अमित छेडदार, सागर बोरगे, महिला कर्मचारी अरुणा राजगुरू, मीना पिंजण, स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली.