Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Pune › सिगारेट पितो म्हणून केले १३ वर्षांच्या मुलाला ब्लॅकमेल

सिगारेट पितो म्हणून केले १३ वर्षांच्या मुलाला ब्लॅकमेल

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 1:59AMपुणे ः प्रतिनिधी 

तेरा वर्षांच्या मुलाला सिगारेट पिण्यास सांगून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आणि  ते चित्रीकरण घरी दाखविण्याची; तसेच सोशल नेटवर्किर्ंंग साईटवर अपलोड करण्याची धमकी देऊन तब्बल 7 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज खंडणी स्वरूपात हडपल्याचा धक्‍कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. 

या प्रकरणी बिबवेवाडीतील सोने विकत घेणार्‍या सोनारासह दोघांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

दागिने विकत घेणारा सोनार रेवनसिद्ध शिलवंत (45, रा. गंगानगर, फुरसुंगी) आणि आदित्य वांद्रे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तेरा वर्षांच्या मुलाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

अल्पवयीन मुलाचे वडील वसतिगृह चालक आहेत. दोन मुले, पत्नी, आई, वडील असा हा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा 17 वर्षांचा असून, तो सध्या बारावीमध्ये;  तर लहान मुलगा 8 वी मध्ये शिकतो. 18 जानेवारी रोजी नातेवाइकांच्या येथे मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. त्या निमित्ताने फिर्यादीच्या पत्नीने आणि आईने पोटमाळ्यावरील कपाटात दागिने ठेवले होते. दागिने ठेवलेल्या कपाटात दागिन्यांचा शोध घेऊनही दागिने मिळाले नाही. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी घरातील सर्वांना याबाबत विचारणा केल्यानंतर छोटा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडू लागला. त्याला धीर देऊन त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यामध्ये त्याने व त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी व वांद्रेने त्याला सिगारेट पिण्यास शिकविले. सिगारेट पित असताना मोबाईलवर तिघांनी त्याचे चित्रीकरण केले. 

याबाबत मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करून त्याला तुझा सिगरेट पितानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल नेटवकिर्ंंग साईटवर अपलोड करू किंवा हे चित्रीकरण तुझ्या वडिलांना दाखवू अशी धमकी दिली. तसेच मारहाणही केली. भीतीपोटी दि. 14 ऑक्टोबर 2017 रोजी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून मुलाने  फिर्यादींच्या खिशातून पैसे घेऊन व दागिने मुलांना दिल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी बिबेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये 1 लाख 75 हजारांचे 7 तोळे किमतीचे सोन्याचे गंठण, पाच तोळ्यांचा 1 लाख 25 हजार रुपयांचा राणीहार, 9 तोळे वजनाच्या-  प्रत्येकी तीन तोळे वजनाच्या- 2 लाख 25 हजारांच्या तीन वेढण्या, 5 तोळे वजनाची 1 लाख 25 हजारांची वेढणी, 37 हजार रुपयांची दीड तोळे वजनाची कर्णफुले, 25 हजारांची एक तोळ्याची खड्याची सोन्याची अंगठी, 35 हजार रुपयांची एक किलो चांदीची वीट आणि 8 हजारांची रोकड असा तब्बल 7 लाख 55 हजारांचा ऐवज मुलाने त्याच्या मित्रांना दिला. आलेला हा ऐवज वांद्रेने सोनार असलेल्या रेवेन शिलवंतला विकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.