Sat, Apr 20, 2019 15:50होमपेज › Pune › अंबडवेटत नातेवाईकांचा हंबरडा 

अंबडवेटत नातेवाईकांचा हंबरडा 

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 27 2018 11:54PMपौड / नांदे : वार्ताहर

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या शिवाजी पुलावर शुक्रवारी (दि.26) साडेअकरा वाजता  झालेल्या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. यात आदर्शगाव अंबडवेट येथील तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अंबडवेट येथील संतोष वरखडे (वय 42), त्याच्या कन्या ज्ञानेश्‍वरी (वय 16) आणि गौरी (वय 14) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी एकच्या सुमारास  अंबडवेट गावात आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला तर उपस्थितांचे डोळेही पानवले होते. यामुळे संपूर्ण अंबडवेट गावासह परिसरावर शोककळा पसरली.

गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडक देऊन कठड्यासह पंचगंगा नदीच्या पात्रात 100 फूट खाली कोसळली.  या मिनी ट्रॅव्हल्समध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या अंबडवेट आणि बालेवाडी येथील 16 जण होते. या 16 पैकी 13 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 जखमींवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.  यातील अन्य मृत व्यक्ती संतोष वरखडे यांच्या सासरवाडीतील पाहुणे होते.  मुळशी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार विजय वरखडे यांचे मयत संतोष वरखडे हे मोठे बंधू आहेत.

घटनेची माहिती विजय वरखडे यांना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कळाल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तालुक्यातील इतरांना दिली.  संतोष वरखडे यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मुळशी तालुक्यात वार्‍यागत पसरली. मनीषा वरखडे यांचाही तालुक्यात विविध कामाच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क होता. त्यामुळे मुळशी तालुक्यातील विविध भागातून नागरिकांनी अंबडवेट गावाकडे धाव घेतली होती. पिरंगुट येथील संतोष वरखडे यांचे जवळचेच अंबडवेट हे गाव असून ते व्यवसायानिमित्त पिरंगुटला वास्तव्यास होते. गौरी व ज्ञानेश्‍वरी ह्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. या अपघाताने अंबडवेट, बालेवाडी आणि पिरंगुट या गावांसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

दुपारी एकच्या दरम्यान तीन मृतदेह दोन रूग्णवाहिकेमधून  अंबडवेट गावात आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला. यामुळे उपस्थित असलेल्यांचेही डोळे पाणावले. अंत्यविधी मुळा नदीकिनारी दुपारी तीन वाजता झाला.  या घटनेतील जखमी मनीषा वरखडे यांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना सायंकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात कोल्हापूरहून आणण्यात आले.