Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Pune › खेळ कुणाला दैवाचा कळला

खेळ कुणाला दैवाचा कळला

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 27 2018 11:59PMपुणे : प्रतिनिधी

भविष्यासाठी आपण अनेक योजना आखतो; पण विधात्याच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज मात्र कोणालाही बांधणे शक्य होत नाही. माणसाचा क्षणाचा भरवसा नाही हे वाक्य अनेकदा पटते आणि अनुभवही देते. याच वाक्याची प्रचिती आज पुण्यातील बालेवाडी भागातील नागरिकांनी घेतली. या भागात अनेक वर्षांपासून राहणार्‍या भरत केदारी यांचे कुटुंबीय गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले. ते परत न येण्यासाठीच..बालेवाडी येथे राहणार्‍या केदारी कुटुंबातील मुलगा, मुलगी  सुना, नातवंडे अशा एकूण 13 जणांवर काळाने शुक्रवारी रात्री झडप घातली. कोल्हापूर येथे झालेल्या ‘भीषण’ शब्दालाही थरथरायला लावेल अशा अपघातात त्यांची बस पंचगंगेत कोसळली आणि केदारी कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले. भरत केदारी आणि मुलगा दिलीप वगळता सारे कुटुंबीय दुसरा मुलगा सचिन याच्या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्यासाठी गणपतीपुळेला गेले होते. 

सोबत दिलीप यांची पत्नी भावना, मुलगी श्रावणी अन् मुलगा साहिलही होते. त्यांच्यासह ज्याचा नवस फेडायचा होता तो अवघ्या नऊ महिन्यांचा सानिध्य, त्याची बहीण संस्कृती आणि आई वडील सचिन-नीलम यांनीही मोठ्या भक्तिभावाने गणपतीचरणी लीन होण्याचं ठरवलं होतं. सोबत भरत यांच्या कन्या छाया आणि मनीषा यांचीही मुलंबाळं  घेतली आणि सारे निघाले प्रवासाला; पण कायमच्या... ! जे तीन जीव वाचले त्यांनी मृत्यूला स्पर्श केला असून,  त्यांच्या मनावर आपली माणसं डोळ्यासमोर गेल्याच्या खुणा मात्र जन्मभर पुसल्या जाणं केवळ अशक्यच! ज्यांनी आयुष्य काय आहे हे अजून अनुभवलं पण नाही अशा 9 महिन्यांपासून ते 16 वर्षे वयापर्यंतच्या सात जणांचा  मृतांमध्ये समावेश आहे. 

नातवंडांनी हे घर कायम गजबजत असायचं. ते आता शांत झालं आहे आणि शेवटपर्यँत राहील. केदारी कुटुंबाच्या घराबाहेर नऊ जणांचे मृतदेह आणले गेले आणि एकच आक्रोश सुरू झाला. कोणाची मुलगी गेली होती; तर कोणाचा नातू, कोणाचा काका गेला होता; तर कोणाची आत्या. कोणी कोणाला सावरायचे हेही नातेवाइकांना उमगत नव्हते. जो तो शोकसागरात बुडून गेला होता. त्यांना शेवटचे बघण्यासाठी क्षणाक्षणाला घटनास्थळी गर्दी वाढत होती. आणि त्याचबरोबर आप्तस्वकीयांचा टाहोदेखील...! काळाच्या पडद्याआड गेलेल्या या सार्‍यांची एक्झिट मनाला चटका लावणारीच ठरली.