होमपेज › Pune › मातृत्व अभियानात ५७ हजार महिला ‘हायरिस्क’

मातृत्व अभियानात ५७ हजार महिला ‘हायरिस्क’

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात 13 लाख 92 हजार गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 57 हजार गर्भवती या अतिजोखमीच्या (हायरिस्क) असल्याचे समोर आले आहे. त्यांना त्वरीत संदर्भ सेवा दिल्यामुळे अनेक माता आणि बालकांचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. तसेच या अभियानाद्वारे देशात सर्वात अधिक महिलांची तपासणी महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 

गर्भवती महिला आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी व त्यांना उपचारांच्या चांगल्या सेवा देण्यासाठी जून 2016 मध्ये हे अभियान देशातील सर्व राज्यांत सुरू करण्यात आले आहे. चौथा महिना पूर्ण झालेल्या मातांची शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये दर महिन्याच्या नऊ तारखेला मोफत तपासणी केली जाते. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतीरोगतज्ज्ञ, फिजिशियन व रेडिओलॉजिस्ट यांच्याकडून तपासणी केली जाते. या तपासणीतच ही गर्भवती सर्वसाधारण आहे की, अतिजोखमीची हे कळते. त्यामुळे या महिलांच्या बाळंतपणाचे नियोजन करणे सोपे जाते. या अभियानाद्वारे महाराष्ट्रात सर्वात अधिक महिलांनी लाभ घेतला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांत योग्य उपचार व जनजागृतीअभावी राज्यात तसेच देशात गर्भवती महिला आणि नवजात बालकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, तो कमी करण्यासाठी या अभियानाचा फार मोठा फायदा झाला आहे.

ज्या मातांना उच्च रक्‍तदाब, अ‍ॅनेमिया (रक्‍ताशय) असतील तर, त्यांना अतिजोखमीच्या माता संबोधण्यात येते. तसेच त्यांची प्रसूती अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या रुग्णालयांत करण्याचा निर्णय घेतला जातो. या अतिजोखमीच्या मातांना जर वेळीच उपचार मिळाले तर त्यांचा व बाळांचा जीव वाचतो. राज्यात कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्‍त संचालक डॉ. अर्चना पाटील, सहायक संचालक डॉ. अनिरुध्द देशपांडे व कार्यक्रम अधिकारी श्रीधर पंडित हे याचे काम पाहतात.

2.29 लाख महिलांची सोनोग्राफी

या अभियानाद्वारे आतापर्यंत दोन लाख 29 हजार महिलांची सोनोग्राफी करण्यात आलेली आहे. ज्या महिलांचा गर्भ वाढत नाही किंवा हृदयाचे ठोके अनियमित असतात, अशा महिलांची सोनोग्राफी करण्यात येते. ही सुविधा मोफत आहे.

267 खाजगी डॉक्टरांचा सहभाग

या अभियानात खाजगी डॉक्टरांनाही सामावून घेण्यात आले असून सेवाभावी तत्त्वाने हे डॉक्टर दर महिन्याच्या 9 तारखेला मोबदला न घेता गर्भवतींची तपासणी करतात. यानुसार राज्यात 267  स्त्रीरोग/प्रसूतीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणि फिजिशियन डॉक्टरांनी नोंदणी केली आहे.