Fri, Jan 18, 2019 19:17होमपेज › Pune › १४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२८ कोटी

१४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२८ कोटी

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 12:56AMलेण्याद्री : वार्ताहर 

छत्रपती शिवरायांचे गड व किल्ले यांचा जिवंत इतिहास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. यासाठी राज्यातील 14 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाच्या वतीने 128 कोटींची कामे सुरू असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत मंत्री तावडे बोलत होते. या वेळी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार शरद सोनवणे, स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, कार्याध्यक्ष विठ्ठलराव जाधव, सचिन आडेकर, सचिव कैलास वडघुले, खजिनदार मारुतीराव सातपुते, तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, अ‍ॅड. राजेंद्र बुट्टे पाटील, कल्याण काकडे, उषा पाटील, संजय खंडागळे, मिनिनाथ लवांडे, मराठा मोर्चाचे रघुनाथ चित्रे पाटील उपस्थित होते.  

या वेळी नामदार विनोद तावडे म्हणाले, छत्रपती शिवराय हे थोर योद्धे व कुशल प्रशासक असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर त्यांच्या जीवनचरित्राची सखोल माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने इयत्ता चौथीच्या इतिहासातील पुस्तकात 11 पाने वाढविली. शिवरायांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने राज्यकारभार सुरू असल्याचेही या वेळी तावडे म्हणाले. या वेळी मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे यास शिक्षणमंत्री विनोद तावडे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. 

पोवाडा सादरीकरण केल्याबद्दल ऋषीकेश काळे, राजवर्धन सदाकाळ, अथर्व डाके, वैभव मुंढे, ओजस काशीद, भावेश बुट्टे, महेश शिंदे, संकेत घोलप, मार्गदर्शक शिक्षक मीननाथ पानसरे, राजश्री सदाकाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कुंजीर यांनी केले; तर सूत्रसंचालन कैलास वडघुले यांनी केले.