Sun, Dec 15, 2019 02:09होमपेज › Pune › पुणे : पाण्याची पाइपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया (video)

पुणे : पाण्याची पाइपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया (video)

Published On: Jul 20 2019 1:26PM | Last Updated: Jul 20 2019 1:26PM
कात्रज : वार्ताहर

कात्रज-कोंढवा रोड वरील शिवगोरक्ष पटांगण येथे सुरू असलेल्या रस्ता विकसनाच्या कामात ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे पाण्याची मुख्य लाइन फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून पाण्याचा लोंढा कात्रज कोंढवा रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. शहर उपनगरात पाणी टंचाई सदृश परिस्थिती असताना वारंवार असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

कात्रज, सुखसागरनगर, गोकुळनगर, कोंढवा, टिळेकरनगर, शिवशंभोनगर या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्र ते कात्रज पंपिंग स्टेशन मार्गे केदारेश्वर पाणी टाकीकडे जाणारी १२०० मीमी व्यासाच्या पाईप लाईन फुटली. शिवगोरक्ष पटांगण येथे रस्ता विकसन व ड्रेनेज लाईन काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पोकलंड मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली.

कोणतेही विकसनाचे काम सुरू असताना त्या ठिकाणी ठेकेदार व मनपा अभियंता उपस्थित असणे आवश्यक असते. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याची लाईन, विद्युत लाईन, ड्रेनेज लाईनची माहिती मशिनरी चालवणाऱ्या कामगारांना देणे आवश्यक असते. मात्र अशा मुख्य विषयाकडे दुर्लक्ष केले जाणे ही गंभीर बाब आहे.

पाण्याची लाईन फुटल्याची माहिती मिळताच पाणी पुरवठा लाईन बंद करण्यात आली. तर उपअभियंता सुनील अहिरे यांनी घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरू केले.

कात्रज कोंढवा रोड येथे उड्डाणपूल, जुना पीएमटी बस स्थानक मागे, शिवगोरक्ष पटांगण समोर मुख्य रस्त्यावर यापूर्वी विकसनाचे काम सुरू असताना अथवा अन्य कारणांनी पाण्याची मुख्य लाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा बेजबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.