Mon, Jul 06, 2020 05:02होमपेज › Pune › दहावी-बारावीचे संभाव्य वेळापत्रकच कायम 

दहावी-बारावीचे संभाव्य वेळापत्रकच कायम 

Last Updated: Nov 19 2019 1:30AM

संग्रहित छायाचित्रपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यासंदर्भात काही लेखी सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सर्व सूचनांचा विचार करून मंडळाने जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रकच कायम केले आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल, तर दहावीच्या परीक्षेसाठी मंगळवार ३ मार्च २०२० ते सोमवार दि. २३ मार्च २०२० हा कालावधी निश्चित केला आहे. 

 राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बोर्डाची परीक्षा घेतली जाते. वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेसाठी साधारण साडे चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, तर बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास साडे तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. आता कायम झालले वेळापत्रक विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सोमवार दि. १८ पासून पाहता येणार आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे येणार्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खातरजमा करून घ्यावी. व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम कोणत्याही मार्गाने आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. असे मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.