Tue, Jun 18, 2019 23:28होमपेज › Pune › ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : सोमवारपासून वेबसाईट होणार सुरू

११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : सोमवारपासून वेबसाईट होणार सुरू

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 12:58AMपिंपरी : प्रतिनिधी 

यंदाच्या 2017-18 वर्षीच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोमवारी (दि. 7) प्रवेशाची वेबसाईट सुरू होणार आहे, अशी माहिती पिंपरी -चिंचवडमधील झोनप्रमुखांनी दिली. 

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या महितीपुस्तिकांचे वाटप 23 एप्रिलपासून करण्यात आले आहे. प्रवेशाची वेबसाईट 2 मे रोजी सुरु होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव सुरु झाली नाही. सोमवारी तरी वेबसाईट सुरु होणार का याकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

वेबसाईट सुरु झाल्यानंतर शिक्षकांनीच विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला भाग भरुन घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये न जाता आपल्याच शिक्षण संस्थांमध्ये अर्जाचा पहिला भाग भरावयाचा आहे. मात्र, जे विद्यार्थी शहराबाहेरुन शिक्षणासाठी आले आहेत त्यांनी शहरातील निगडी किंवा भोसरी या दोन झोनपैकी जवळपासच्या झोनमध्ये जाऊन अर्ज भरायचे आहेत.  अकरावी प्रवेशाचे www.11thadmission.net हे संकेतस्थळ आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तकाबरोबर लॉग इन अ‍ॅड्रेस देण्यात आला आहे. मुख्याध्यापकांनी प्रवेश अर्ज भरताना माहिती पुस्तकाबरोबर दिलेले लॉग इन आणि पासवर्ड वापरून विद्यार्थ्यांचे लॉग इन करायचे आहे. 

कोणत्याही कोट्यातून किंवा शाखेत प्रवेश घ्यायचा असला तरीही अकरावीला जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचा केंद्रीय प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर लॉग इन करून अर्जाचा पहिला भाग भरणे आवश्यक आहे. अर्जाच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरायची आहे.