Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › १११ अनफिट पीएमपी रस्त्यांवर

१११ अनफिट पीएमपी रस्त्यांवर

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 12:47AMपुणे : नवनाथ शिंदे

शहरातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) तब्बल 111 अनफिट बस विविध रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या महामंडळाकडून बस फिटनेस पासिंगकडे दुर्लक्ष का करण्यात आले आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पीएमपीएलच्या स्वमालकीच्या 1 हजार 433 बसेस आहेत. त्यापैकी एप्रिल 2017 ते मार्च 2018 वर्षभरादरम्यान 1 हजार 221 बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित 212 बसेसपैकी 101 बस भंगारात काढल्या असून, अद्यापही तब्बल 111 बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासाला धोका निर्माण झाला आहे. प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व वाहनांची फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. तपासणी दरम्यान वाहनांचा ब्रेक, इंडिकेटर, आरसे, वाहन प्रदुषण पातळी, अग्निविरोधी यंत्रणा, आसन क्षमता, आपत्कालीन मार्गाची तपासणी करुन ‘आरटीओ’कडून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते.

‘पीएमपीएमएल‘च्या नोंदीनुसार 111 बसेसची फिटनेस तपासणी झाली नाही. त्यामुळे बसला अपघात झाल्यास शहरासह उपगनरात प्रवास करणार्‍या नागरिकांची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पीएमपीएमएल तसेच खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार्‍या अनेक बस मोडकळीस आल्या आहेत. तरीही अशा बसमधून प्रवाशांची असुरक्षित वाहतूक केली जात असल्याचे चित्र आढळून येत आहे. त्यातच 111 अनफिट बसेस रस्त्यावर धावत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणार्‍या काही अनफिट बसेसवर ‘आरटीओ’ने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

अपघातप्रसंगी प्रवासाला आपत्कालीन खिडकीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, काही बसेसचा आपत्कालीन मार्ग सुस्थितीत नसल्यामुळे ‘आरटीओ’कडून अशा बसेस पासिंग करण्यात आल्या नाही. परिणामी बसेसच्या आपत्कालीन मार्गामुळे पासिंगसाठी रखडलेल्या बसेस बिनधास्तपणे रस्त्यावर धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाला असुरक्षित नागरिकांच्या प्रवासाचे गांभीर्य लक्षात कधी येणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.