Fri, May 24, 2019 21:05होमपेज › Pune › शिक्षणाच्या माहेरघरात पिस्तूलधार्‍यांचा वावर!

शिक्षणाच्या माहेरघरात पिस्तूलधार्‍यांचा वावर!

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 1:00AMपुणे : अक्षय फाटक

‘शिक्षणाचे माहेरघर’ असे बिरुद मिरविणारे पुणे पिस्तूलधार्‍यांचे आहे, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. एकीकडे बड्या हस्तींना भयमुक्त राहण्यासाठी कायदेशीर पिस्तूल बाळगण्याची गरज भासत असताना दुसरीकडे शहरात बेकायदेशीर पिस्तूलधार्‍यांचाही वावर वाढत आहे. पुणे पोलिसांच्या नजरेतून हे पिस्तूलधारी सुटत नाहीत; पण त्यांचे म्होरके पोलिसांना सापडत नाहीत, हे  वास्तव आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी 111 पिस्तुले आणि  269 काडतुसे जप्त केली, तर सव्वाशे जणांना अटक केली आहे. 

शांत, सुसंस्कृत आणि सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहराला गुन्हेगारीने विळखा घातल्याचे सध्याचे चित्र आहे.   कोयते, तलवारी घेऊन टोळक्यांचा धुडगूस सुरू असतो, पण  आता कोयते आणि तलवारीची जागा हळूहळू पिस्तुलाने घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे भयमुक्त राहण्यासाठी बड्या हस्तींना पिस्तुलाचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या दोन वर्षात 350 पुणेकरांनी  कायदेशीर पिस्तूल बाळगण्यासाठी धाव घेतली आहे.

मात्र, शहरात बेकायदेशीर पिस्तुलांचेही प्रमाण वाढत आहे. त्याची कारणेही अंचबित करणारी आहेत. गुन्हेगारी विश्वातली असुरक्षितता पिस्तूल बाळगण्याचे एक मुख्य कारण असले तरी स्टेटस व डॅशिंगसाठी पिस्तूल बाळगण्याची क्रेझ आहे. त्यातूनच पिस्तूल बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याकडे पिस्तूल आहे, हे चारचौघांमध्ये कळावे, यापद्धतीने हे पिस्तूल जाणीवपूर्वक ठेवले जाते. त्यामुळे आपसूकच सामान्य नागरिकांचे त्यांच्याकडे लक्ष जाते. त्यातही अनेकजण परिसरात धाक बसविण्यासाठी पिस्तूल बाळगत आहेत. वाद होताच भाईगिरीत दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडतात.   त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त अवस्थेत आहेत. 

गेल्या वर्षात पिस्तुलाचा धाक दाखवून अनेक घरफोड्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे  लूटमारी आणि घरफोडीच्या घटनांमध्येही पिस्तुलाचा वापर करत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, पोलिसांनी काही जणांना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पकडले. त्यावेळी चौकशीत काहीजण शौक म्हणून पिस्तूल बाळगत असल्याचे समोर आले आहे. पिस्तूल वापरणार्‍यांमध्ये सर्वात जास्त तरुणांचे प्रमाण असून, ही चिंतेची बाब ठरत आहे.

म्होरक्यापर्यंत पोचण्यात अडचणी

मुळातच ही पिस्तुले  बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातून आणली जातात. या राज्यांमध्ये पिस्तूले बनविणारी काही शहरेच आहेत. तेथील मुख्य व्यवसायच शस्त्रे बनवण्याचा आहे.  या ठिकाणी पाच ते दहा हजारांमध्ये पिस्तूल मिळते. महाराष्ट्रात आणून ते 25 ते 30 हजारांना विकले जाते. कवडीमोल भावात पिस्तूल मिळत असल्याने ते बाळगण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जाते. दुचाकी वाहनावर पिस्तुले आणली जातात. त्यामुळे ती पकडलीही जात नाहीत. परराज्यातून येणारी ही पिस्तुले पाहता त्यांच्या म्होरक्यापर्यंत पोचण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.