पिंपरी : अमोल येलमार
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वात जास्त गुन्हेगारी असणार्या परिमंडळ तीनमधील गुन्हेगारी थोपवण्यात काही केल्या पोलिसांना यश येताना दिसत नाही. दिवसें-दिवस गुन्हेगारी वाढत असून अवघ्या तीन महिन्यात तब्बल 1100 गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत. यातील निम्याहून अधिक गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून पोलिसांच्या हाती लागत नाहीत. पोलिसांच्या खबर्याचे जाळे कमी होत असल्याने गुन्हेगार मोकाट वावरत आहेत. वाढणारी गुन्हेगारी लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास मंत्रीमंडळात मान्यता मिळाली आहे, मात्र ते प्रत्यक्षात कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परिमंडळ तीनच्या हद्दीतील नऊ पोलिस ठाण्यात एक जानेवारी ते 31 मार्च 2018 दरम्यान गंभीर स्वरुपाचे 1104 गुन्हे दाखल झालेले आहेत. तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झाल्याचे यावरुन दिसून येत आहे. शहरात खून, खूनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, मारहाण, फसवणूक, महिलांवर अत्याचार, दरोडा, चोर्या यासारखे गुन्हे भरदिवसा घडत आहेत. किरकोळ कारणावरुन खून, पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन जिव घेणा हल्ला, भरदिवसा हातात नंग्या तलवारी घेवून टोळी वर्चस्वासाठी मारामारी या प्रकारामुळे शहरातील नागरिक भयभयीत झालेला आहे. पुणे पोलिसांच्या चार परिमंडळ पैकी परिमंडळ तीनमध्ये नेहमीच गुन्हेगारी जास्त असते. चालू वर्षाच्या मागील तिन महिन्यात खुनाच्या नऊ घटना, खुनी हल्ल्याचे 18 प्रकार घडलेले आहेत. तसेच महिला अत्याचाराचे 89, मारहाणीचे 121, वाहन चोरीचे 272, जबरीचे चोरीचे 42, घरफोडीचे 60, विश्वासघात, फसवणूकीचे 65, सार्वजनिक ठिकाणी दंगा माजवल्याचे 33 गुन्हे दाखल आहेत.
पोलिस दफ्तरी दाखल असलेली वरील आकडेवारी पाहता शहरात पुर्व वैमन्यासातून हातात कोयते, तलवारी, लाकडी दांडके घेवून समोरच्यावर वार केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडलेले आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांसोवत इतरांचा विश्वासघात, फसवणूक केल्याचेही गुन्हे अनेक आहेत. याचसोबत सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करत दहशत माजवल्याचे 33 गुन्हे दाखल आहेत, ही बाब चिंताजनक आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर, नव्याने उदयास येणारे, अल्पवयीन गुन्हेगार तसेच काही ‘रेकॉर्ड’वरचे गुन्हेगारावर यांच्यावर पोलिसी खाक्या दाखवण्याचे गरज निर्माण झालेली आहे. भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी मारहाण, तोडफोड, दहशत माजवणे हे प्रकार सुरु आहेत. पोलिसांच्या कागदोपत्री कारवायामुळे काही गुन्हेगार स्वतःचे डोके वर काढताना दिसत आहेत. मात्र या गुंडाचा वेळीच बंदोबस्त केल्यास शहरातील गुन्ह्यांची आकडेवारी नक्कीच खाली येताना दिसेल. काम करताना वरिष्ठ पोलिस अधिकार्यांवर राजकीय दवाव येत असल्याचा आरोप खासदारांनी केला होता. त्यामुळे राजकीय दबाव झिटकारुन गुन्हेगारांना खाक्या दाखवणे गरज झालेली आहे.