Fri, Aug 23, 2019 14:36होमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’ला ११ कोटी देण्यास मंजुरी

‘पीएमपीएमएल’ला ११ कोटी देण्यास मंजुरी

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

महापालिकेच्या तत्कालीन पीएमटीला आर्थिक मदत करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी बँकेत ठेवण्यात आलेल्या ठेवीचे पीएमपीकडून व्याज भरले जात नाही. त्यामुळे या ठेवी तारणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रस्ताव ठेवला होता. त्यास अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बँकेत ठेवण्यात आलेल्या या ठेवींवर पीएमपीने काढलेले कर्ज तसेच त्यावर व्याजाचे 11 कोटी रुपये महापालिका संबंधित बँकांना अदा करणार आहे. ही रक्कम पीएमपीला दिल्या जाणार्‍या संचलन तुटीमधून वळती केली जाणार आहे. 

निधी उभारणीसाठी महापालिकेने पीएमपीस कर्ज काढण्यासाठी 34 कोटींच्या ठेवी 1998 ते 2002 या कालावधीत तीन बँकांमध्ये ठेवल्या होत्या. त्या ठेवी अद्यापही तारण मुक्त झालेल्या नाहीत. याबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शंभर नवीन बस खरेदी करण्यासाठी पीएमटीस महापालिकेने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 1998 आणि 2001 मध्ये प्रत्येकी 6 आणि 17 कोटी तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2003 मध्ये 11 कोटी रुपयांच्या मुदतठेवी तारण ठेवल्या. या ठेवींवर पीएमटीला 30 कोटी 60 लाख रुपयांचा ओडी उपलब्ध करून देण्यात आली.

त्यानुसार, पीएमटीकडून वेळोवेळी या ठेवींवर ‘ओडी’ घेतली जात होती. त्यानंतर 2009 मध्ये पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण झाल्यानंतर हे कर्ज कंपनीने फेडून त्या ठेवी महापालिकेस तारणमुक्त करून देणे आवश्यक होते. मात्र, पीएमपीने त्याकडे दुर्लक्ष करत त्या ठेवींवर गरजेच्या वेळी कर्ज काढले. त्यानंतर 2017 पासून पीएमपीकडून या कर्जाची मुद्दल आणि व्याजही भरणे बंद करण्यात आले. त्यामुळे या कर्जाचा भार दरवर्षी वाढतच असून या ठेवींवर सद्यस्थितीत 11 कोटी 92 लाख 77 हजार 731 रुपयांचे कर्ज आहे. या ठेवी बँकेकडून वर्ग करून घेतल्या जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत पीएमपी प्रशासनाकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आल्यानंतर या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.