होमपेज › Pune › ज्येष्ठ नागरिक पासच्या माध्यमातून साडेअकरा कोटींचे उत्पन्न

ज्येष्ठ नागरिक पासच्या माध्यमातून साडेअकरा कोटींचे उत्पन्न

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:57AMपुणे : प्रतिनिधी 

ज्येष्ठ नागरिकांना पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या मासिक पास योजनेतून ‘पीएमपी’स गेल्या दीड वर्षात सुमारे 11 कोटी 60 लाख 20 हजार 920 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या काळात दरमहा पासचे दर केवळ 450 रुपये होते. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सप्टेबर 2017 पासून ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात वाढ केली होती. त्या कालावधीतसुद्धा पासची विक्री वाढलेली असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांना शहर आणि परिसरात कोठेही प्रवास करता यावा यासाठी पीएमपी प्रशासनाने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सुरू केला होता. त्यानुसार साडेचारशे रुपये एवढ्या कमी दरामध्ये मासिक पास ज्येष्ठ नागरिकांना देण्याची सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक मासिक पासचे दर अत्यंत कमी असल्यामुळे, त्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी चांगलाच घेतला होता. गेल्या दीड वर्षात 2 लाख 10 हजार 161 ज्येष्ठ नागरिकांनी मासिक तसेच त्रैमासिक पासचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. 

एप्रिल 2016 ते मार्च 2017 या एक वर्षाच्या कालावधीत 1 लाख 31 हजार 535 एवढ्या मासिक पासची विक्री झाली होती. तर केवळ 1 हजार 358 त्रैमासिक पासची विक्री झाली होती. त्यानंतर एप्रिल 2017 ते ऑगस्ट 2017 या पाच महिन्यांच्या कालावधीत मासिक पास 53 हजार 117 आणि सप्टेेंंबर ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत साधारणपणे 44 हजार 996 पासची विक्री झालेली आहे. अर्थात सप्टेेंंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी 450 रुपये मासिक पासचे असलेले दर 750 रुपये केले होते. 

मासिक पासच्या वाढलेल्या दरावरून या कालावधीत पीएमपी प्रवासी मंच तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासह लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठविला होता. मात्र त्यास न जुमानता मुंढे यांनी मासिक पासच्या दरामध्ये केलेली वाढ कमी करण्यास नकार दिला होता. मुंढे यांच्या कालावधीतसुद्धा सुमारे 44 हजार 996 पासची विक्री झाली होती. मुंढे यांची बदली होताच संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत साडेसातशे रुपये करण्यात आलेले दर कमी करून ते साडेपाचशे रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काळात ज्येष्ठ नागरिक मासिक पासच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती देताना ‘पीएमपी’चे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड म्हणाले, मागील पाच महिन्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पास दरात वाढ करण्यात आली होती; तरीदेखील सुमारे 44 हजार 996 पासची विक्री झाली होती. आता मात्र पासच्या दरात संचालक मंडळाने कपात केलेली आहे. त्यामुळे पास विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

Tags : pune, pune news, Pune Municipal Corporation,  Senior Citizen Pass, Income,