Tue, Jun 18, 2019 23:22होमपेज › Pune › पिंपरी शहरात 100 ठिकाणी ‘ई-टॉयलेट’

पिंपरी शहरात 100 ठिकाणी ‘ई-टॉयलेट’

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:33AMपिंपरी : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी अधिक सुंदर ठेवण्यासाठी  शहरातील रस्ते आणि उद्यानामध्ये तब्बल 100 ‘ई-टॉयलेट’ बांधण्यात येणार आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. सदर टॉयलेट वापरासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क अदा करावे लागणार नाही.  

मुंबईतील द लायन्स क्लब ऑफ मुंबई इमेज या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पालिका हा उपक्रम राबवत आहे. त्यास आयुक्तांनी 16 मे रोजी आणि स्थायी समितीने 30 मे रोजी मंजुरी दिली आहे. या संदर्भात पालिका व संस्थेमध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. 

हा उपक्रम 15 वर्षे कालावधीसाठी शहरातील विविध रस्ते व उद्यानात राबविला जाणार आहे. ‘ई-टॉयलेट’ उभारणीचा सर्व खर्च संस्था करणार आहे.  तिरूअनंतपूरम, केरळ येथील सायंटिफीक सोल्युशन्स, पुण्यातील सॅमटेक क्लीन अ‍ॅण्ड केअर सिस्टीम्स किंवा वसईतील नॅचरल आय टॉयलेट सोल्यूशन या कंपन्यांचे ‘ई- टॉयलेट’ बसविण्यात यावेत, अशी बंधन पालिकेने घातले आहे. टॉयलेटसाठी पालिका मोफत जागा उपलब्ध करून देणार आहे. तसेच, जलनिस्सारण व पाण्याचा जोड देणार आहे. 

‘ई-टॉललेट, त्यातील उपकरणे व कर्मचार्याचा विमा संस्थेने स्वखर्चाने काढावा. प्रत्येक टॉयलेटसाठी संस्थेला 5 हजार रूपये रक्कमेची ठेव पालिकेकडे ठेवावी लागणार आहे. स्वतंत्र वीजजोड घेण्याची जबाबदारी संस्थेची आहे. सदर टॉयलेटची स्वच्छता, दुरूस्ती.  देखभाल आणि सुरक्षा संस्थेला करावी लागणार आहे. ठरलेल्या आकारमानानुसार संस्थेला टॉयलेटवर जाहिरात करता येणार आहे. नियमित साफसफाई होत नसल्याचे पालिकेस आढळल्यास प्रतिदिनी 100 रूपये दंड आकारला जाणार आहे. टॉयलेटच्या आजूबाजूची जागा संस्थेला वापरता येणार नाही. सदर ठिकाणी नेमलेल्या कर्मचार्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागले पाहिजे. तक्रार येणार नाही याची दक्षता संस्थेने घ्यावी, आदी अटी व शर्ती करारमान्यामध्ये समाविष्ट आहेत. लवकरच करार होऊन शहरातील विविध ठिकाणचे रस्ते आणि उद्यानात ‘ई-टॉयलेट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे.