होमपेज › Pune › देशात पहिल्या तिमाहीत विक्रमी १०० लाख टन साखर उत्पादन

देशात पहिल्या तिमाहीत विक्रमी १०० लाख टन साखर उत्पादन

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 12:59AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

देशात चालू वर्षीच्या हंगाम 2017-18 मध्ये सुमारे 250 लाख टनाइतके साखर उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी पहिल्या तिमाही उत्पादनात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर महिनाअखेर सुमारे 100 लाख टनाइतके उत्पादन हाती आल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. आर्थिक वर्षाचा विचार करता पहिल्या तिमाहीमध्ये झालेले हे विक्रमी साखर उत्पादन असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशपातळीवर होत असलेल्या साखर उत्पादनाची माहिती संकलित करून नियमितपणे ते सर्व साखर उद्योगाला देण्यासाठी महासंघाची सर्व व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून त्यातूनच विक्रमी साखर उत्पादन झाल्याचे समोर आले आहे. देशात यापूर्वी 81.50 लाख टन साखर उत्पादनाच्या पहिल्या तिमाहीचा विक्रम होता. तो 100 लाख टन उत्पादन हाती आल्याने मोडीत निघाल्याचे सांगून याबाबत ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले की, देशभरात सुमारे 492 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. गतवर्षी याच काळात 459 साखर कारखाने सुरू होते.

देशात सद्यस्थितीत डिसेंबर महिनाअखेर 1 हजार 7 लाख 23 हजार टनाइतके ऊस गाळप पूर्ण झाले असून गतवर्षी याचवेळी सुमारे 826.18 लाख टन ऊस गाळप झाले होेते. तर, गतवर्षी देशात याच काळात 9.85 टक्क्यांइतका मिळालेल्या साखर उतार्‍यात चालू वर्षीच्या हंगामात किंचित वाढ होऊन ते 9.96 टक्के मिळाला आहे. देशात उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू ही राज्ये ऊस उत्पादनातील प्रमुख आहेत.

देशभरातील एकूण ऊस उपलब्धता, सुरु असलेले ऊस गाळप आणि सध्याचा साखर उतारा पाहता साखर उत्पादनात उत्तरप्रदेश प्रथम क्रमांक मिळविण्याची अपेक्षा आहे. देशात हंगाम 2017-18 अखेर सुमारे 100 लाख टन साखर उत्पादन एकट्या उत्तरप्रदेशात होण्याचा प्राथमिक अंदाज असून महाराष्ट्रात 73 लाख टन, कर्नाटकात 25 लाख टन आणि गुजरातमध्ये 11 लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.