Fri, Sep 21, 2018 21:06होमपेज › Pune › मृदा, जलसंधारणाच्या कामास १०० % अनुदान

मृदा, जलसंधारणाच्या कामास १०० % अनुदान

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:23AMपुणे : प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत (विशेष घटक योजना) अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यासाठी पुणे जिल्ह्यास दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. जी. पलघडमल यांनी दिली.

अनुसूचित जातीमधील शेतकर्‍यांना उत्पन्नांचे इतर कायमस्वरुपी साधन नसते. त्यांचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले की, अनुसूचित जातीच्या शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे राहणीमान सुधारणे आणि त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची संमती घेऊन त्यांच्या वैयक्तिक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची कामे केली जातील. त्यामध्ये प्रामुख्याने सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, अनघड दगडी बांध, शेततळी, मजगी, जुने भात दुरुस्ती आणि सामूहिक स्वरुपाचे माती नाला बांध, सिमेंट नाला बांध आदीचा समावेश आहे. या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखल, सात बारा उतारा आणि 8 अ चा उतारा इत्यादी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. या योजनेतंर्गत लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकर्‍यांनी तालुका कृषि अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच उपविभागीय कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.