Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Pune › खंडपीठासाठी शंभर एकर जागा देवू

खंडपीठासाठी शंभर एकर जागा देवू

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 1:40AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यात खंडपीठ होण्यासाठी जोमाने हालचाली सुरू झाल्या असून, पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यासाठी पीएमआरडीएच्या नवीन विकास आराखड्यामध्ये शंभर एकर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन अन्न, नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले. पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बापट यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरला खंडपीठ झाल्यानंतर शंभर कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पुण्यात खंडपीठ मिळविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 

गेल्या महिन्यात कोल्हापुरला खंडपीठासाठी निधी दिल्याची बातमी समोर आली. त्यानंतर पुणे जिल्हा बार असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली. तसेच, एक दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला होता. तर, पालकमंत्री बापट यांना न्यायालयात उपस्थित राहुन खंडपीठाबाबत नक्की काय झाले आहे, याचा खुलासा करावे, असे पत्र पाठविले होते. ते खुलासा करण्यास हजर राहिले नाही, तर त्यांच्या घरावर वकिलांचा मोर्चा काढण्यात येणार होता.मात्र, कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू करण्याबाबत केवळ शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले आहे. राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

मुलाचा विवाह असल्याने काही दिवसांनी भेटण्याचा खुलासा बापट यांनी पुणे बार असोसिएशनकडे केला होता. त्यानुसार शनिवारी व्ही.आय.पी.सर्किट हाऊस येथे बापट आणि पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडाळीची बैठक झाली. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. भूपेंद्र गोसावी, अ‍ॅड. रेखा करंडे, सचिव अ‍ॅड. लक्ष्मण घुले, माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड, माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. नितीन झंजाड आदी बैठकीस उपस्थित होते.

आगामी अधिवेशनामध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आशश्‍वासन यावेळी बापट यांनी दिले. तसेच, शिवाजीनगर न्यायालयात पार्किंग, स्वच्छतागृह, उपहारगृह आणि सीसीटीव्ही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगितले.