Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Pune › सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍याला दहा वर्ष सक्तमजुरी 

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍याला दहा वर्ष सक्तमजुरी 

Published On: Sep 03 2018 7:17PM | Last Updated: Sep 03 2018 7:16PMपुणे : प्रतिनिधी 

बिस्कीट देण्याच्या बहाण्याने सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या एकाला विशेष न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीची अ‍ॅट्रॉसिटी आणि धमकाविल्याच्या गुन्ह्यातून न्यायालयाने मुक्तता केली.  

अर्जुन भिमा जाधव (23, रा.संजय पार्क, झोपडपट्टी, न्यु. एअरपोर्ट, लोहगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. खटल्यात विशेष सरकारी वकील अरूंधती रासकर यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त शाम मोहिते यांनी केला. तर त्यांना तपास कामी सहायक पोलिस फौजदार एस. एन. बोंगाळे, पोलिस हवालदार जालिंदर भोर आणि महिला पोलिस सुवर्णा जगताप यांनी मदत केली. 1 नोव्हेंबर 2014 रोजी संध्याकाळी ही घटना घडली. 

आरोपी हा मुलगी व तिच्या कुटुंबियांचा ओळखीचा असून मुलगी त्याला बापू मामा म्हणून संबोधत होती. घटनेच्या दिवशी अर्जुन याने तिला बिस्कीट खायला देतो म्हणून घरात बोलविले. त्याने आतून दरवाजाला आतून कडी लावून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपीला अटक झाली.  पिडीत मुलगी अनुसुचित जातीची असताना देखील तिच्यावर अत्याचार केल्याने याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमांअंतर्गत तसेच बलात्कार आणि बाल लैंगिक अत्यचाराच्या विविध कलमांन्वये आरोपपत्र दाखल झाले. खटल्यात विशेष सरकारी वकील अरूंधती रासकर यांनी आठ साक्षीदार तपासताना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.