Thu, Jun 27, 2019 10:13होमपेज › Pune › दहाचे नाणे चलनात; धाकधूक मात्र मनात

दहाचे नाणे चलनात; धाकधूक मात्र मनात

Published On: Dec 31 2017 1:48AM | Last Updated: Dec 31 2017 12:30AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

दहा रुपयांचे नाणे हे चलनात असूनही अनेक ठिकाणी ते नाकारले जाते. हे नाणे का नाकारले जात आहे, याची काही ठोस कारणे नाहीत. नाणे चलनात सुरु असल्याची माहिती अनेकांना आहे. मात्र दुकानदार ते स्वीकारत नसल्याने ग्राहकांनीही ते नाकारणे सुरू केले व हा ट्रेंड पसरत गेला, असे निरीक्षण एका बँकेच्या अधिकार्‍याने मांडले आहे.

दहा रुपयांचे नाणे चलनात नाही, अशी अफवा काही महिन्यांपूर्वी पसरली होती. तिचे खंडन काही बँकांनी केले. व्यवहारांत हे नाणे काही ठिकाणी स्वीकारले जातेही. त्यामुळे नाणे चलनात असल्याचे सिध्दच झाले. तथापि ‘भीतीपोटी ब्रह्मराक्षस’ या म्हणीप्रमाणे, काहीजणांनी ते घेतले नाही म्हणून मीदेखील घेणार नाही, अशी भावना अनेकांच्या मनात आहे.
रोख पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकांना काही बँकांनी ही नाणी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दिली.

दहा नाण्यांची एक पिशवी, म्हणजे शंभर रुपये, या हिशेबाने बँकांनी नाण्यांचे वितरण केले. ग्राहकांनी त्या पिशव्या स्वीकारल्या; तथापि नंतर पुन्हा बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या त्या ग्राहकांकडील नाण्यांच्या त्या पिशव्या बँकांनी काही कारणास्तव घेतल्या नाहीत, अशी उदाहरणे आहेत. साहजिकच त्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली व त्यांच्यामुळे अन्य नागरिकही भयभीत झाले. नाण्यांचा बाजार पुन्हा थंडावला. 

बँकेच्या काही अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडेच दहा रुपयांच्या नाण्यांचा मोठा साठा जमा झाला आहे. तो व्यवहारांत आणण्यासाठी त्यांनी तो ग्राहकांना वितरीत केला. मात्र नंतर ग्राहकांनी ती दहा रुपयांची नाणी पुन्हा बँकेत भरण्यासाठी आणल्यावर त्यांना आपण विनंती केली व बँकेत ती नाणी भरू नका असे सांगितले. याचे कारण दहा रुपयांची नाणी बाजारात फिरत राहावीत, या हेतूनेच बँकांनी ती त्यांना दिली होती. ग्राहकांनी ती नाणी पुन्हा बँकेत भरल्यानंतर तो हेतू साध्य झाला नसता, तसेच बँकेतील नाण्यांचा साठा कमीही झाला नसता. परंतु बँकांच्या नकारामुळे ग्राहकांचा गैरसमज झाला व नाण्यांचा प्रसार खोळंबला.

दहा रुपयांचे नाणे चलनात सुरू आहे व यापुढील काळातही ते सुरूच राहील, असा भरवसा सरकारने जनतेला द्यायला हवा. त्यासाठी एखादी मोहीमच काढायला हवी, असे मत एका बँकेच्या अधिकार्‍याने व्यक्त केले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी अचानक नोटबंदी केली व काही नोटा बंद झाल्या. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले. या सरकारचे कामकाज बेभरवशाचे आहे, असा एक समज काही जणांमध्ये आहे. त्यामुळे हे नागरिक धोका पत्करायला तयार नाहीत, असेही एका ज्येष्ठ नागरिकाने नमूद केले.