Thu, Apr 25, 2019 13:37होमपेज › Pune › पोलिसांकडे सव्वादहा लाखांची थकबाकी

पोलिसांकडे सव्वादहा लाखांची थकबाकी

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 1:10AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे पोलिसांच्या विविध कार्यालयांसाठी मिळकती भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मात्र, पोलिस खात्याकडून वेळेवर भाडे भरले जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. पालिकेच्या 4 पैकी 3 मिळकतींचे एकूण 10 लाख 25 हजार 993 रुपये भाडे पोलिसांनी थकविले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय 15 ऑगस्टला सुरू करण्याचे नियोजन आहे. पोलिस आयुक्तालयासाठी पालिकेने प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील महात्मा फुले इंग्रजी माध्यम शाळेची इमारत दिली आहे. तसेच, विविध ठिकाणच्या आखणी काही इमारती पालिका पोलिसांना देणार आहे. त्यासाठी पालिका राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) नियमानुसार भाडे दर आकारणार आहे. 

पालिकेने पुणे शहर पोलिसांसाठी काही इमारती या पूर्वीच भाड्याने दिल्या आहेत. त्याचे भाडे पोलिसांकडून वेळेवर भरले जात नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत 1 एप्रिल त 31 मार्च 2018 या कालावधीतील पोलिसांकडून किती भाडे अदा झाले आहे, त्याची माहिती  पालिकेच्या भूमी जिंदगी विभागाकडून मागविली होती. त्यात ही बाब समोर आली आहे. 

पालिकेच्या मोहननगर, चिंचवड येथील संघवी महाविद्यालयाशेजारील बहुउद्देशीय इमारत पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या गुन्हे शाखेसाठी दिली आहे. त्याचे जीएसटीसह 3 लाख 50 हजार 177 रूपये भाडे थकले आहे. तर, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील चिंचवड येथील परिमंडळ तीनचे कार्यालयाचे 4 लाख 1 हजार 324 रूपये भाडे येणे बाकी आहे. गांधीनगर, पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहातील वाहतुक पोलिस कार्यालयाचे एकूण 2 लाख 74 हजार 492 रूपये भाडे प्रलंबित आहे. हे तिन्ही कार्यालय ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. तर, पिंपळे गुरवमधील उद्यानातील पिंपळे गुरव पोलिस चौकीसाठी 6 हजार 417 रूपये मासिक भाडे आहे. सदर भाडे अदा करण्यात आले आहे. थेरगावातील सर्व्हे क्रमांक 9 येथील पोलिस चौकीसाठी खोल्या भाडे तत्त्वावर देण्याची कार्यवाही सुरू आहे.