होमपेज › Pune › बालिकेच्या पोटातून काढली १० किलोंची गाठ 

बालिकेच्या पोटातून काढली १० किलोंची गाठ 

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:03AMमंचर : प्रतिनिधी 

घरात अठरा विशे दारिद्य्र अनुभवत असतानाच पोटच्या गोळ्याला जीवघेण्या व्याधींनी ग्रस्त केले. जन्माला आल्यापासून पोटाचा भयंकर आजार घेऊनच ती जन्माला आली आणि पाहता पाहता वयाच्या पंधरा वर्षांपर्यंत वय वाढले, तसा तिचा आजारही वाढला. हताश होऊन नशिबी आलेले दुःख सांगावे तरी कुणाला या विवंचनेत सापडलेल्या तिच्या आईची आर्त हाक आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ऐकली व त्या मुलीच्या पोटातून तब्बल 10 किलोची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. 

आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे व श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश कानडे यांच्या शेतावर नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील गजू माळी व त्याचे कुटुंब काम करून संसाराचा गाडा ओढत आहेत. गजू माळी यांची मुलगी अनु ही जन्मापासूनच पोटांच्या व्याधींनी ग्रस्त झाली होती. तिच्या आईने तिला विविध ठिकाणी डॉक्टरांकडे नेले, वैद्यकीय अधिकार्‍यांचा अनेकदा सल्लाही घेतला, औषध उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही केला; मात्र अनु पंधरा वर्षांची होऊनही तिचा आजार कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात बळावला.

तिच्या वेदना तिला जीव असह्य करू लागल्या. उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिच्या आजारावर उपचार होणार नाही, उपचारांसाठी परदेशात जावे लागेल,  उपचारासाठी कमीतकमी 20 ते 25 लाख रुपये खर्च येईल, हे ऐकल्यानंतर माळी कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली तर दुःखाचा डोंगर कोसळला. ती माउली त्या मुलीला घेऊन मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेली. मंचर येथील डॉ. अंबादास देवमाणे यांनी तिच्या आजाराचे रिपोर्ट काळजीपूर्वक तपासून पोटात मोठी गाठ असल्याचे निदान वर्तवले. व अनेक तपासण्या कराव्या लागतील, त्यासाठी मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. 

डॉक्टरांचे म्हणणे ऐकून ती महिला त्या मुलीला घेऊन दवाखान्याबाहेर येत होती. त्यावेळी डॉ. गणेश पवार यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. डॉ. पवार यांनी तिला धीर देत याबाबत डॉ. देवमाणे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्याशी चर्चा करून  शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. अनुच्या आवश्यक तपासण्या करण्याची जबाबदारी डॉ. सदानंद राऊत यांनी घेतली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजीवकुमार भवारी, डॉ. वृषाली जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. वृषाली मेकर, डॉ. मनीषा मोरे, दिलीप करवंदे, संजय सोमवंशी  यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया 28 फेब्रुवारी रोजी पार पाडली. व तब्बल 10 किलोची गाठ अनुच्या पोटातून काढण्यात आली. हा गोळा काढून डॉक्टरांनी अनुला नव्याने जीवनदान दिले. डॉक्टरांच्या अथक परिश्रमातूनच अनुचा पुनर्जन्म झाला असल्याची सुखद भावना तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया

अनूची करण्यात आलेली शस्रक्रिया ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असून, जगात अशा चार शस्त्रक्रिया या पूर्वकाळात झाल्याचा दावा वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला आहे, तर ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडल्याचा आनंद डॉक्टरांनी दहा किलोचा केक शुक्रवार, दि. 23 रोजी कापून साजरा केला, तर अनुला नवीन कपडे घेऊन तिच्या पुढील आयुष्यासाठी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील,  गटविकास अधिकारी राहुल कारभोळ, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. तब्बल पंचवीस लाखांचा खर्च असणारी शस्त्रक्रिया  पूर्णतः मोफत करण्यात आल्याने माळी कुटुंबाने उपजिल्हा रुग्णालय, रुग्णकल्याण समितीचे आभार मानले.

 

Tags : pune, pune news, girl, stomach, 10 kg tumor,