होमपेज › Pune › महापालिका रक्षणासाठी १ हजार १८१ सुरक्षारक्षक 

महापालिका रक्षणासाठी १ हजार १८१ सुरक्षारक्षक 

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 27 2017 11:58PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध मालमत्ता, पाण्याच्या टाक्या, दवाखाने आणि पालिकेच्या शाळांच्या संरक्षणासाठी एकूण 1 हजार 181 सुरक्षारक्षक व मदतनिसांची नियुक्ती ठेकेदारी पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी 17 कोटी 14 लाख 72 हजार रुपये खर्चाला स्थायी समितीने मंगळवारी (दि.26) मान्यता दिली.

महापालिका भवनासह 8 क्षेत्रीय कार्यालये, 16 करसंकलन कार्यालये, प्रेक्षागृहे, उद्याने, पाण्याच्या टाक्या, भाजी मंडई अशा महापालिकेच्या सुमारे 750 मालमत्ता आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी महापालिकेने कायमस्वरूपी रखवालदार नियुक्त केले आहेत; मात्र रखवालदारांची संख्या कमी पडत आहे. मालमत्तांचे 24 तास संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मालमत्तांवर ठराविक कालावधीसाठी ठेकेदारी पद्धतीने विविध ठेकेदारांमार्फत मदतनीस नेमले जातात.

सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त 45 कर्मचारी, नव्याने झालेले नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृह येथे 15 मदतनीस आणि काळेवाडी व फुगेवाडी भुयारी मार्ग येथे 7 मदतनीस असे जादा 67 कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यानुसार मदतनिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा इमारतींच्या संरक्षणासाठी 294 रखवालदार व मदतनीस पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार 316 रखवालदार व मदतनीस पुरविण्यात येणार आहेत. शहरात रस्ते, चौक या ठिकाणी 150 ट्रॅफिक वार्डन नेमण्यात येणार आहेत.

सुरक्षा विभागामार्फत नियुक्त केल्या जाणार्‍या या मदतनिसांना मूळ वेतन 5 हजार रुपये, महागाईभत्ता 3 हजार 256 रुपये व इतर असे एकूण 11 हजार 526 रुपये वेतन देण्यात येणार आहेत. कामगार कल्याण विभागाने कळवल्यास प्रत्यक्ष दरवाढ त्या तारखेपासून लागू होणार आहे. कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.