Wed, Apr 24, 2019 00:14होमपेज › Pune › शहरात 1.65 लाख डेंग्यू डास उत्पत्तिस्थळे

शहरात 1.65 लाख डेंग्यू डास उत्पत्तिस्थळे

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 14 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या आरोग्य विभागाने यावर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात कायमस्वरूपी आणि तात्पुरते अशी तब्बल एक लाख 65 हजार डेंग्यू डासांची उत्पत्तिस्थळे आढळून आली आहेत. गेल्यावर्षी ही संख्या 89 हजार इतकी होती. शहरात नवीन 11 गावांचा समावेश केल्याने ही संख्या वाढली आहे. टाक्या, हौद, विहिरी, तळघर व इतर जलसाठे ही कायमस्वरूपीची तर नदीकिनारचे खड्डे, बांधकामे, कमळकुंड, कारंजे, ड्रेनेज ही तात्पुरती उत्पत्तिस्थळे म्हणून ओळखली जातात. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कीटक प्रतिबंधक विभागाकडून दरवर्षी पावसाळ्याआधी आणि पावसाळा संपल्यानंतर डेंग्यू डासांच्या उत्पत्तिस्थळांची मोजणी करण्यात येते. यावर्षी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान ही मोजणी करण्यात आली असता उत्पत्तिस्थळांमध्ये 40 टक्के वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम सातत्याने सुरू असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये शहरात नवीन 11 गावांचा समावेश झाला आहे. तेथील डेंग्यू उत्पत्तिस्थळांची संख्या शहराच्या संख्येत समाविष्ट झाली आहे. 

आरोग्य सेवकांची 45% पदे रिक्‍त

कीटक प्रतिबंधक विभागात डेंग्यू उत्पत्तिस्थळांची मोजणी, अबेटिंग, धूर फवारणी आदी कामांसाठी एक हजार पदांची आवश्यकता आहे. सध्या केवळ 513 पदे मंजूर आहेत. पण त्यापैकीही 282 पदे (55 टक्के) भरलेली असून उरलेली 231 (45 टक्के) पदे रिक्‍तच आहेत. त्यामुळे 132 पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी स्वरूपात भरलेली आहेत. त्यातच नवीन 11 गावांचा समावेश झाल्याने या पदांची संख्या वाढणे गरजेचे आहे.

आरोग्य सेवकांची संख्या वाढणे गरजेचे

गेल्यावर्षी शहरात हद्दीतील 11 गावांचा नव्याने समावेश केल्याने डेंग्यू उत्पत्तिस्थळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आधीच आरोग्य सेवकांची कमी संख्या असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्‍त ताण येत असल्याने नियोजित वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे डेंग्यूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी दिली. शहरात गेल्यावर्षी डेंग्यू उत्पत्तिस्थळांची संख्या 89 हजार 600 होती. ती आता वाढून एक लाख 65 हजार 965 वर पोचली आहे. शहराची हद्द वाढल्याने कीटक प्रतिबंधक विभागात काम करणार्‍या सेवकांची संख्याही वाढणे आवशक आहे.