Tue, Apr 23, 2019 22:42होमपेज › Pune › ...अन्यथा बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार

...अन्यथा बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दि. 21 फेब्रुवारीपर्यंत मान्य न झाल्यास बारावीच्या लेखी परीक्षा आणि पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे. 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी डिसेंबर महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकनात पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना अजून 20 टक्के अनुदान देण्यात यावे, दि. 2 मे 2012 नंतर नियुक्‍त झालेल्या शिक्षकांना मान्यता व वेतन देण्यात यावे, 2003 ते 2010-11 पर्यंत मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांसाठी तरतूद करावी; तसेच 23 ऑक्टोबरचा शासनाचा जीआर रद्द करण्यात यावा, माहिती तंत्रज्ञान विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या पदांना मान्यता घेऊन त्यांना अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे.

यापूर्वी राज्यभरात टप्प्याटप्प्याने शिक्षकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 8 डिसेंबरला राज्यातील तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले, तर दुसर्‍या टप्प्यात 18 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दि. 2 फेब्रुवारी रोजी राज्यभरात एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थी हितासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 15 दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महासंघाद्वारे दि. 3 फेब्रुवारी रोजी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडतील; तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचा कोणताही ताण न घेता अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे, असे महासंघाचे अध्यक्ष  प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले.