Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Pune › ‘डिजिटल व्यवहार करणे कठीण काम नाही’

‘डिजिटल व्यवहार करणे कठीण काम नाही’

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:47AMपिंपरी : प्रतिनिधी 

डिजिटल व्यवहार करणे खूप सोपे आहे. हे फार कठिण काम नाही. डिजिटल व्यवहार करण्यासाठी शिक्षणाची गरज नसते. अगदी कमी शिकलेल्या व्यक्ती देखील बहुतांश ठिकाणी डिजिटल व्यवहार करताना सध्या पहायला मिळतात, असे मत  ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी व्यक्त केले.

निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्राच्या मनोहर वाढोकर सभागृहात स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्‍वस्त संस्था आणि दैनिक ‘पुढारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.4) ‘भीमरूपी महामुद्रा’ या ‘डिजिटल पेमेंट प्रक्रिया समजून घेण्याचा मार्ग,’ या विषयावर चंद्रशेखर ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘कॅशलेस’ व्यवहाराच्या संकल्पनेचा लाभ घेतला. चलनी नोटांशिवाय सुरक्षित व्यवहार कसे करता येतील याचे धडे यावेळी त्यांनी घेतले.  याप्रसंगी स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्‍वस्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, उपाध्यक्ष यशवंत मीठभाकरे, विश्‍वस्त अ‍ॅड. श्रीकांत दळवी, जनसेवा सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक विलास लांडगे, कस्तुरी क्लबच्या उपक्रम सल्लागार मधुरा दाते आदी उपस्थित होते. 

यावेळी ठाकूर म्हणाले, नोटा मिळत नाहीत म्हणून डिजिटल व्यवहार करणे चुकीचे आहे. आपल्यातील बरेच नागरिक कर भरत नाहीत. नोकरदाराच्या खिशातून कर वसूल केला जातो. मात्र, रस्त्यावर वडापाव किंवा इतर किरकोळ व्यावसायिकांचे उत्पन्न जास्त असले, तरी ते कर भरतातच असे नाही.  सरकारकडून जास्तीतजास्त नागरिक करआकारणीच्या जाळ्यात यावेत म्हणून डिजिटल व्यवहारांवर भर दिला जात आहे. ज्यामुळे सरकारकडे कोट्यवधी  रुपयांचा कर जमा होईल आणि त्याद्वारे विकासकामे केली जातील, असे अर्थतज्ज्ञ सांगतात. डिजिटल व्यवहाराविषयी अधिक माहिती देताना ठाकूर यांनी ‘भीम अ‍ॅप’विषयी माहिती दिली. ‘भीम अ‍ॅप’ वापरताना बँकेचे खाते, डेबीट कार्ड, मोबाईल या तीन गोष्टी आवश्यक आहेत. ‘भीम अ‍ॅप’ हे सरकारी ‘अ‍ॅप’ असल्यामुळे विश्‍वसनीय आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच फोन बिल, वीज बिलाचे ऑनलाईन पेमेंट करताना त्या वेबसाईटचा अ‍ॅड्रेस टाकावा. काही बनावट वेबसाईट . www.http d www. https असे दोन पर्याय असतात. यामध्ये www. https  ही शेवटी s असणारी ही खात्रीशीर वेबसाईट आहे. त्यामुळे खोट्या बेवसाईटमुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. आपल्यातील बर्‍याच व्यक्ती फसवणूक होते म्हणून डिजिटल व्यवहार करण्यास घाबरतात. अकाऊंट हॅक होण्याचा प्रकार हा लाखामध्ये एखादा असतो आणि तोही ग्राहकांच्या चुकीमुळे होत असतो. आपल्या खात्याची माहिती ही कधीही फोनवर देऊ नये, असे वारंवार सांगूनही काही व्यक्ती अशा फसवणार्‍यांच्या आहारी जातात. जर तुम्हाला बँक खाते  हॅक होण्याची भीती वाटत असेल, तर व्यक्तीने स्वत:कडे  दोन खाती ठेवावीत आणि ज्या बँकेच्या खात्यातून डिजिटल पेमेंट करायचे आहे त्यामध्ये पाच हजारांवर रक्कम ठेवू नये.  

यानंतर ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबतर्फे कूपन वाटप करण्यात आले. यातून चंद्रशेखर ठाकूर यांच्या हस्ते काढलेल्या लकी ड्रॉमध्ये दोन व्यक्तींना माधवबागतर्फे आरोग्य तपासणीचे गिफ्ट व्हाऊचर देण्यात आले.