Mon, Jul 22, 2019 13:15होमपेज › Pune › शंभर कोटींच्या कामांना ऐनवेळी मंजुरी

शंभर कोटींच्या कामांना ऐनवेळी मंजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी बहुमजली इमारत बांधण्यासाठी 50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला आयत्या वेळेस सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. 

‘वायसीएम’ रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण अशी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सन 2016-17 च्या अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  रुग्णालयासाठी राज्य सरकारने वाढीव 0.50 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आर्किटेक्ट शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएशन यांना सुधारित नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात रुग्णालय आवारात बहुमजली वाहनतळ, कॅन्टीन, नाईट शेल्टर तसेच इतर आवश्यक कामांसह शस्त्रक्रिया संकुलाच्या एकत्रित आराखड्याचा समावेश आहे. या खर्चात वाढ करून ती 50 कोटींवर नेण्यात आली. त्यास सभेने मान्यता दिली. 

सुदर्शननगर चौकात सद्यस्थितीत सिग्नल व्यवस्था आहे. प्रवासी वाहतूक वेळेत बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत व्हावी, यासाठी चौक सिग्नल मुक्त करण्यासाठी ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामास सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशीर्षाखाली समाविष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी 20 कोटी वाढीव खर्चास सभेने मंजुरी दिली.  तळवडे जकात नाका ते देहूगाव कमानीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच भूसंपादन होणार आहे. जागेचे संपादन झाल्यास रस्ता विकसित करण्याच्या  कामासाठी 30 कोटी रुपये खर्चास आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. दरम्यान, सदर तीनही विषय 20 नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी स्वीकारण्यात आले होते. ती सभा तहकूब करण्यात  आली होती.