Mon, Jun 01, 2020 01:34होमपेज › Pune › आता पुणे-मुंबई अंतर होणार कमी

आता पुणे-मुंबई अंतर होणार कमी

Published On: Jun 13 2019 1:50AM | Last Updated: Jun 13 2019 1:50AM
पुणे : प्रतिनिधी

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे-वरील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी एक्सप्रेस वेच्या विस्तारीकरणाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे.  तब्बल 4200 कोटींची कामे करण्यात येणार असून, यामुळे मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. 

या विस्तारीकरणामुळे अमृतांजन पूल आणि संपूर्ण बोरघाट टाळून पुणे-मुंबई दरम्यानचे अंतर कापणे शक्य होणार आहे. त्याकरिता दोन महाकाय बोगदे आणि तेवढेच मोठे पूल बांधले जाणार आहेत. 
मुंबईहून पुण्याला येताना बत्तीस किलोमीटरवर कळंबोली टोल नाका आहे. कळंबोली टोल नाक्यापासून हा आठपदरी रस्ता सुरू होणार आहे. या रस्त्याने साधारणपणे सात किलोमीटर अंतर चढून आडोशी गावाजवळ सातशे मीटर लांबीचा पूल सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर बोरघाटातून पुढे आल्यावर दरीमध्ये पूल उभा करण्यात येणार आहे. याकरिता मुंबई-वांद्रे-वरळी सी लिंकसाठी वापरलेले तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. 

ऑफकॉम या शापूरजी पालनजी कंपनीशी संबंधित कंपनीला या प्रकल्पातील दोन्ही पुलांचे काम देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सागर पाटील यांनी दिली. 

महत्त्वाचे मुद्दे :

    दोन पुलांसाठी 1491.50 कोटी
    दोन बोगद्यांसाठी 2697  कोटी
    सी लिंकसाठी वापरलेले तंत्रज्ञान