पीपीएफ आणि मॅच्युरिटी  

Last Updated: Mar 22 2020 8:02PM
Responsive image


अपर्णा देवकर

सार्वजनिक भविष्य निधी ही दीर्घकाळासाठी चांगली गुंतवणूक योजना आहे. पीपीएफमध्ये मॅच्युरिटीचा कालावधी हा पंधरा वर्षांचा असतो आणि तो पुढे वाढवताही येतो. आर्थिक सल्लागारांच्या मते, जर मॅच्युरिटीच्या काळात पैशाची गरज भासत नसेल, तर पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळासाठी पीपीएफचे खाते सुरू ठेवू शकतो. या खात्याचा सर्वात लाभ म्हणजे पीपीएफ खात्यातून काढण्यात येणार्‍या पैशांवर करसवलतीचा लाभ मिळतो.

प्राप्‍तिकर कलम 80 सीनुसार पीपीएफ खात्यात दीड लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करून करसवलतीचा लाभ मिळवू शकतो. यात व्याज आणि मॅच्युरिटीचे उत्पन्नदेखील करमुक्‍त आहे. जेव्हा आपले पीपीएफ खाते परिपक्‍व होईल म्हणजेच पंधरा वर्षं पूर्ण होतील तेव्हा काय पर्याय असतील, हे जाणून घेऊ. खाते बंद करू शकता : पीपीएफ सुरू करण्यापासून ते पंधरा वर्षं पूर्ण झाल्यास ते खाते बंद करू शकता. पीपीएफच्या मॅच्युरिटीनंतरही खाते पुढेही चालू ठेवू शकतो.

वर्षातून एकदा पैसे काढण्याचा पर्याय : मॅच्युरिटीनंतरही पीपीएफ खात्यात जमा असलेल्या पैशावर व्याज मिळत राहील. खातेधारक हा प्रत्येक आर्थिक वर्षात एकदाच कितीही रक्‍कम काढू शकतो.
पुढील पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते : जर खातेधारकाने पंधरा वर्षानंतरही खाते सुरू ठेवण्याचा आणि बचत करण्याचा निर्णय घेतला असेल, तर पुढील पाच वर्षांपर्यंत लॉक करता येते. मॅच्युरिटीनंतरही या खात्याला कितीदा मुदतवाढ द्यावी, यावर मर्यादा नाही. 

फॉर्म एच भरून द्यावा लागणार : पीपीएफची मॅच्युरिटी झाल्यानंतर खाते सुरू ठेवायचे असेल, तर ते खाते परिपक्‍व झाल्यानंतर एक वर्षाच्या आत फॉर्म एच भरून द्यावा लागतो. तर व्याज मिळणार नाही : जर खातेधारकाने फॉर्म एच भरला नाही, तर पीपीएफ खात्यातील जमा पैशावर कोणतेही व्याज मिळत नाही. या परिस्थितीत नव्याने गुंतवणूक करत असाल तरी त्याचा लाभ करसवलतीच्या रूपातून मिळणार नाही.