Mon, Nov 18, 2019 21:31होमपेज › None › पाकिस्तान 'तोपर्यंत' एअरस्पेस भारतासाठी खुला करणार नाही!

पाकिस्तान 'तोपर्यंत' एअरस्पेस भारतासाठी खुला करणार नाही!

Published On: Jul 12 2019 7:14PM | Last Updated: Jul 12 2019 6:45PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतीय व्यवसायिक विमानांच्या उड्डाणांसाठी पाकिस्तानमध्ये एअरस्पेस देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भारत जोपर्यंत आपली लढाऊ विमाने प्रत्यक्ष ताबा रेषे नजीकच्या परिसरातून (फॉरवर्ड एरिया) मागे घेत नाही तोपर्यंत व्यावसायिक उड्डाणांसाठी पाकिस्तानचे एअरस्पेस खुले करणार नसल्याचे पाकिस्तानचे हवाई वाहतूक सचिव शाहरुख नुसरत यांनी सांगितले आहे. 

गुरुवारी पाकिस्तानमधील विमान चालनाविषयी शाहरुख नुसरत यांची पाकिस्तान संसदीय सामितीसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भारताच्या व्यवसायिक विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद राहील असे सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत सरकारने आम्हाला हवाईक्षेत्र उघडण्यास सांगितले होते. मात्र प्रथम त्यांनी त्यांची लष्करी विमाने लष्करी तळांपासून हटवावित, असे कळविण्यात आल्याचे त्यांनी समितीस सांगितले.

कश्मीरमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्लाानंतर भारतीय वायुसेनेने लढाऊ विमानांद्वारे बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केला होता. या कारवाईनंतर २६ फेब्रुवारीला पाकिस्तानने भारतीय व्यवसायिक विमानांना आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.

भारताच्या नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, भारतीय व्यवसायिक विमानांना पाकिस्तानने एअरस्पेस बंद झाल्याने २ जुलैपर्यंत भारतीय विमान कंपन्यांना ५४८ कोटी रुपयांचा तोटा झाला. यात एअर इंडियाला २ जुलैपर्यंत ४९१ कोटी, ३१ मे पर्यंत इंडिगोला २५.१ कोटी, २० जूनपर्यंत स्पाईस जेटला ३०.७३ कोटी तर गो-एअरला २.१ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती दिली होती. तसेच पाकिस्तानने घातलेल्या एअरस्पेस बंदीमुळे भारतीय विमान उद्योगाला प्रचंड नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

पाकिस्तानच्या एअरस्पेस बंदीनंतर प्रवासी उड्डाणे भारताद्वारे पर्यायी मार्गांवर वळविली जात आहेत. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे नुकत्याच झालेल्या शांघाय सहकार संघटना शिखर बैठकीस जाण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानास पाकिस्तान हवाई क्षेत्राने विशेष परवानगी दिली होती. मात्र, मोदींच्या व्हीव्हीआयपी विमानाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून उड्डाण करण्याचे टाळले होते.