Tue, May 30, 2017 04:08
29°C
  Breaking News  


होमपेज › None › मुंबई-पुणे अंतिम झुंज! 

मुंबई-पुणे अंतिम झुंज! 

By pudhari | Publish Date: May 20 2017 2:42AM


बंगळूर : वृत्तसंस्था 
कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट आणि 33 चेंडू राखून दणदणीत पराभव करून मुंबई इंडियन्सने थाटात अंतिम फेरीत धडक मारली. आता आयपीएलच्या दहाव्या सत्राच्या अजिंक्यपदासाठी येत्या रविवारी पुणे सुपरजायंट आणि मुंबई यांच्यात हैदराबाद येथे झुंज होईल. नाईट रायडर्सला 18.5 षटकात 107 धावांत गारद केल्यानंतर मुंबईने हे
टार्गेट 14.3 षटकात 4 बाद 111 धावा काढून सहज पूर्ण केले. आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारण्याची  मुंबईची ही चौथी वेळ ठरली. फिरकीपटू कर्ण शर्मा (16 धावांत 4 विकेट) आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (7 धावांत 3 विकेट)  मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 
108 धावांचे माफक टार्गेट असलेल्या मुंबईनेही लिंडले सिमोन्स (3) आणि पार्थिव पटेल (14) आणि अंबाती रायडू (6) यांच्या विकेट 34 धावा असतांनाच गमावल्या. पण त्यानंतर कृणाल पंड्या (30 चेंडूत नाबाद 45) आणि रोहित शर्मा (24 चेंडूत 26) यांनी 6.4 षटकात 54 धावांची भागीदारी करून केकेआरचे आव्हान संपुष्टात आणले. 
तत्पूर्वी, फिरकीपटू कर्ण शर्मा  आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह यांच्या भेदक मार्‍याच्या बळावर मुंबईने केकेआरला 18.5 षटकातं 107 धावांतच गारद केले. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 31 धावा केल्या. 
चिन्नास्वामीच्या संथ खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय केकेआरला भोवला. बुमराहने दुसर्‍या षटकात ख्रिस लिनला (1) पोलार्डकरवी झेलबाद केले. तुफानी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनील नारायणला  (10) पाचव्या षटकात कर्णच्या गोलंदाजीवर पार्थिवने यष्टिचित केले. त्याच्या पुढच्या षटकात रॉबिन उथप्पाला (1) बुमराहने पायचित केले. सातव्या षटकात कर्णने केकेआरला दोन जबर दणके दिले. पाचव्या चेंडूवर कर्णधार गौतम गंभीरला (12) पंड्याकडे झेल देण्यास भाग पाडल्यानंतर ग्रॅण्डहोमेला पायचित केले. त्यामुळे केकेआरची अवस्था 5 बाद 31 अशी भीषण झाली. 
केकेआरला शंभरीही अवघड वाटत असताना यादव आणि इशांत जग्गी (31 चेंडूत 28) यांनी सहाव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी करून ही पडझड थांबवली. अर्थात, फटकेबाजी करणे त्यांना जमले नाही. कर्ण शर्माने आपली चौथी विकेट जग्गीच्या रुपात 15 व्या षटकात घेतली. त्यावेळी केकेआरच्या 87 धावा होत्या. मग उर्वरित 20 धावांत यादवसह केकेआरचे उर्वरित फलंदाजीही तंबूत परतले. कर्ण आणि बुमराहशिवाय मिचेल जॉन्सनने 28 धावांत 2  विकेट घेतल्या.