सियाचीन पर्यटकांसाठी खुला, राजनाथ सिंह यांची घोषणा

Last Updated: Oct 21 2019 6:38PM
Responsive image

Responsive image

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जगातील सर्वात उंच युद्ध भूमी सियाचीनला आता या पुढे पर्यटकांना भेट देता येणार आहे. सियाचीन परिसर पर्यटनासाठी खुले झाल्याची घोषणा खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. सियाचीन बेस कॅम्पपासून कुमार चौकापर्यंतच्या संपूर्ण परिसर पर्यटकांना अनुभवता येणार आहे. सोमवारी लडाखमधील कर्नल चेवांग रिंचन पुलाच्या उद्घाटना प्रसंगी राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. 

पाकिस्तानच्या सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखमधील दुरबुक आणि दौलत बेग ओल्डी (डीबीओ)दरम्यान कर्नल चेवांग रिंचन पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. पूलाच्या उद्घाटनामुळे लडाख व परिसरातील संपर्क सुधारला जाईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत आणि चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन हे या वेळी उपस्थित होते. 

भारतासाठी राजनयिक महत्त्व असणारा हा पूल चीनच्या सीमेवर वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) पूर्वेस ४० किमी पूर्वेला आहे. हा पूल श्योक नदीवर १४,६५० फूट उंचीवर बनविला गेला आहे. 

सैन्याच्या वरिष्ठ अधिका-याच्या म्हणण्यानुसार दौलत बेग ओल्डी हे जगातील सर्वात उंच लँडिंग ग्राऊंड (एअरबेस) आहे.

चीनच्या सीमेवर येण्यासाठी भारतच्या लष्काराला कमी वेळ लागेल

कर्नल चेवांग रिंचन पुलाची उभारणी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केली आहे. हा पूल काराकोरम पासच्या अगदी जवळ आहे. येथून आठ किमी अंतरावर एलएसी आहे. जम्मू-काश्मीरची चीनला लागून असलेली १५९७ किमी लांबीची सीमा एलएसी म्हणून ओळखली जाते. हा पूल १४०० फूट लांबीचा आहे असून १३,००० फूट उंचीवर आहे. चीनच्या सीमेवर भारतच्या लष्काराला येण्यास फारच कमी वेळ लागेल. 

लडाखच्या या पुलाचे नाव कर्नल चेवांग रिंचन असे आहे. चेवांग यांनी १९४८ आणि १९७१ साली पाकिस्तान विरुद्ध आणि १९६२ साली चीन विरुद्धच्या युद्धांमध्ये अदम्य धैर्य दाखवले होते. त्यांना २ वेळा महावीर चक्रने गौरविण्यात आले आहे.