Thu, Nov 14, 2019 06:32होमपेज › None › तहानलेल्या चेन्नईमध्ये पाणी एक्स्प्रेस दाखल

तहानलेल्या चेन्नईमध्ये पाणी एक्स्प्रेस दाखल

Published On: Jul 12 2019 2:48PM | Last Updated: Jul 12 2019 2:48PM
चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

तामिळनाडूची राजधानी चेन्नईला गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी संकटावर मात करण्यासाठी ५० वॅगनची रेल्वे २.५ दशलक्ष लिटर पाण्यासह वेल्लोर जिल्ह्यातील जोलरपेट रेल्वे स्टेशनपासून चेन्नईला आज (दि.१२) सकाळी रवाना करण्यात आली. दुपारपर्यंत ही रेल्वे चेन्नईतील विलीवक्कम रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झाली. लवकरच दुसरी ट्रेनही चेन्नईमध्ये पोहचेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

चेन्नई शहरातील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. शहराजवळील अनेक तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट तीव्र झाले आहे. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी वेल्लोरहून रोज १० दशलक्ष लिटर पाण्याची आवक केली जाईल अशी घोषणा एआयएडीएमकेचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी केली होती. त्यानुसार आज पाण्याची पहिली रेल्वे चेन्नईत दाखल झाली. रेल्वेच्या प्रत्येक वॅगनमधून ५५ हजार लिटर पाण्याची वाहतूक करण्यात आली आहे. या पाण्याच्या वाहतूकीसाठी चेन्नई शहर पाणी पुरवठा विभागाला दक्षिण रेल्वे विभागाला प्रत्येक फेरीला ७.५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. 

चेन्नई शहराला रोज ८३० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र सध्या रेल्वेच्या माध्यमातून आणण्यात येणा-या पाण्याद्वारे शहराची तहान ५२५ दशलक्ष लिटर पर्यंतच भागवण्यात यश येणार आहे. तसेच सध्याची पाणी टंचाई अशीच कायम राहिली तर वेल्लोरहून पुढील सहा महिने रेल्वेच्या माध्यमातून पाण्याची वाहतूक केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. चेन्नई शहर पाणी पुरवठा विभागाने शहरात ९०० टँकरच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणी टंचाई प्रश्नी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारवर ताशेरे ओढले आहेत.