Sun, Feb 23, 2020 17:42होमपेज › None › ओबामांच्या बास्केटबॉल जर्सीचा लिलाव, मिळाले तब्बल ८५ लाख

ओबामांच्या बास्केटबॉल जर्सीचा लिलाव, मिळाले तब्बल ८५ लाख

Published On: Aug 20 2019 4:07PM | Last Updated: Aug 20 2019 4:09PM
न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बास्केटबॉल जर्सीचा लिलाव नुकताच पार पडला. ओबामा यांच्या या २३ क्रमांकाच्या जर्सीला ८५.४० लाख रुपये (१ लाख २० हजार अमेरिकन डॉलर) किंमत मिळाली आहे. हेरिटेज ऑक्शन हाऊसने याबाबत माहिती दिली. ओबामा हे १८ वर्षाचे असताना त्यांनी १९७८ ते १९७९ दरम्यान शालेय बास्केटबॉल स्पर्धेत ही जर्सी परिधान केली होती. 

बराक ओबामा यांचे क्रीडाप्रेम सर्वश्रूत आहे. बास्केटबॉल आणि बेसबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. होनुलुलु (हवाई) पुनाहो हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. अशाच एका बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेदरम्यान परिधान केलेल्या जर्सीचा लिलाव नुकताच करण्यात आला. ओबामा यांच्या त्यावेळचे शाळेतील ज्यूनिअर व ५५ वर्षीय पीटर नोबल यांनी ही २३ क्रमांकाची जर्सी जपून ठेवली होती. त्या जर्सीचा नुकताच लिलाव झाला. या जर्सीला ८५.४० लाख रुपये किंमत मिळाली आहे. 

लिलावादरम्यान जवळपास २७ जणांकडून बोली लावण्यात आली होती. यामध्ये एका अमेरिकन आणि खेळ-कलाकृती संग्रहकर्त्याने ही जर्सी खरेदी केली. त्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. 

ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसमध्ये तेथील कर्मचा-यांसोबत अनेकवेळा बास्केटबॉल खेळाचा आनंद लुटला आहे. याचे अनेक फोटो वेळोवेळी सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत.