Sun, May 31, 2020 11:59होमपेज › None › देशात दुसरे महाभारत घडवणार का?; ओवेसींचा संतप्त सवाल

देशात दुसरे महाभारत घडवणार का?; ओवेसींचा संतप्त सवाल

Published On: Aug 14 2019 3:55PM | Last Updated: Aug 14 2019 3:55PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी तामिळ चित्रपटाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवेसी म्हणाले की, तामिळनाडूमधील एका कलाकाराने (रजनीकांत) जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांना कृष्ण-अर्जुन यांची जोडी असे म्हणून कौतुक केले होते. मात्र, मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मग पांडव आणि कौरव कोण आहेत ? तुम्ही देशात दुसरे महाभारत घडविणार आहात काय? असे म्हणत ओवेसी यांनी जोरदार टिका केली आहे. 

ओवेसी म्हणाले की, मल माहिती आहे की भाजप सरकारचा काश्मीरी जनतेवर प्रेम नसून त्यांच्या जमीनींवर डोळा आहे. भाजप सत्तेच्या ताकदीवर जम्मू-काश्मीरमध्ये निर्बंध लादत आहे. काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध सरकारने मागे घेणे आवश्यक आहे. सरकारच्या मते जर काश्मीरी जनता कलम ३७० रद्द केल्यानंतर खूश आहे, तर त्यांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव का केला जात आहे. कर्फ्यू का हटविला जात नाही ? 

ते पुढे म्हणाले की, भारतात अजूनही नथुराम गोडेसे सारख्या देशविघातक व्यक्तीचे अनुयायी जिवंत आहेत. ते माझाही गोळी घालून खून करतील. मी एक खासदार असूनही मला अरुणाचल प्रदेश, किंवा लक्षद्वीपला जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मी आसामध्ये जमीन खरेदी करू शकतो का? असा सवाल ही त्यांनी केला. 

कलम ३७० हटवून काश्मीरच्या जनतेला जसे अन्यायाच्या गर्तेत ढकलले गेले आहे, त्याच पद्धतीने या पुढे नागालँड, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेशमधील जनतेला देखील धोका दिला जाणार आहे, असाही आरोप ओवेसी यांनी केंद्र सरकारवर करत हल्लाबोल केला.

रजनीकांत, सरकारच्या निर्णयाला मिशन कश्मीर म्हणतात...

रजनीकांत यांनी ११ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर राज्याशी संबंधीत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करत दोघांच्या जोडीला कृष्ण-अर्जुन जोडी म्हणत कौतुकाचा वर्षाव केला होता. रजनीकांत यांनी काश्मीर प्रश्नी सरकारच्या निर्णयाला मिशन काश्मीर असे म्हटले होते. त्यांनी संसदेत अमित शहा के भाषणाचे कौतुक करत आता अनेकांना समजेल अमित शहा कोण आहेत.