Wed, May 27, 2020 02:46होमपेज › None › INDvSA : हिटमॅन रोहितची धमाल; भारत २०२/०

INDvSA : हिटमॅन रोहितची धमाल; भारत २०२/०

Published On: Oct 02 2019 9:58AM | Last Updated: Oct 02 2019 4:01PM
विशाखापट्टणम : पुढारी ऑनलाईन

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीरच्या आपल्या नव्या भूमिकेत हिट ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितने शतकी खेळी करून संघाचा कर्णधार विराट कोहलीसह भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच कर्णधार विराट कोहलीने रोहितवर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. कोहली म्हणाला की, कसोटीत सलामीवीर म्हणून रोहितच्या यशाने भारताची फलंदाजी अधिक प्राणघातक होईल. 

रोहितने ५४ व्या षटकात शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीचे चौथे शतक आहे, तर सलामीवीर म्हणून पहिले शतक आहे. रोहितने १५४ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. मयांक आणि तो अद्यापही क्रीजवर आहेत. 

यापूर्वी रोहित कसोटी सामन्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करीत असे. परंतु, केएल राहुलच्या खराब कामगिरीनंतर रोहितला कसोटीत सलामीची संधी मिळाली आहे. 

पहिल्या कसोटीत भारताने कोणतीही विकेट न गमावता २०२ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ११५ (१७४ चेंडू) आणि मयंक अग्रवाल ८४ (१८३ चेंडू) क्रीजवर आहेत. ६० व्या षटकात पंचांमध्ये संवाद झाला आणि त्यांनी खराब हवामानामुळे चहापानासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पंचांनी उरलेल्या दिवसाचा खेळ रद्द केला.

यासह रोहित शर्मा भारतीय भूमीवरील कसोटी सामन्यात सलग सहाव्यांदा ५० व ५० हून अधिक धावा करणारा (८२, ५१*, १०२*, ६५, ५०*, १००* डाव अजून सुरू) भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडशी बरोबरी केली आहे. द्रविडने १९९७-१९९८ साली कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय मैदानावर सलग सहावेळा ५० व ५० हून अधिक धावासंख्यांची खेळी केली होती. रोहितने २०१६ से २०१९ दरम्यान ही कामगिरी केली आहे. रोहित शर्माने या कसोटी आधी मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत नाबाद ६३ धावांची खेळी केली होती. मात्र त्यावेळी तो सहाव्या क्रमांकावर खेळण्यास आला होता. 

सराव सामन्यात रोहित शर्मा सलामीला उतरला होता. मात्र, तो शून्यावर बाद झाला. या नंतर त्याच्या खेळावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने धावांची लूट करत आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरविला.