Sun, Sep 22, 2019 22:12होमपेज › None › पावसाचा व्यत्यय; न्यूझीलंडचे द्विशतक

पावसाचा व्यत्यय; न्यूझीलंडचे द्विशतक

Published On: Aug 14 2019 8:35PM | Last Updated: Aug 14 2019 8:35PM
गाले : वृत्तसंस्था

अनुभवी फलंदाज रॉस टेलर (नाबाद 86) व हेन्‍री निकोलस (42) यांच्या चिवट फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 5 बाद  205 धावांपर्यंत मजल मारली आहे. पाऊस आणि अंधूक प्रकाश यामुळे 22 षटकांचा खेळ होऊ शकला नाही.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला, तेव्हा टेलरसोबत सँटेनर 8 धावांवर खेळत होता. पाहुण्या न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. रावल (33) व टॉम लॅथम (30) यांनी न्यूझीलंडच्या पहिल्या डावास सुरुवात करताना 64 धावांची सलामी दिली. लॅथम परतल्यानंतर कर्णधार केन विलियमसनही शून्यावर बाद झाला. पाठोपाठ रावलही परतला. यामुळे न्यूझीलंडची स्थिती 3 बाद 71 अशी झाली. 

संघाची स्थिती बिकट असताना अनुभवी रॉस टेलर व हेन्‍री निकोलस यांनी श्रीलंकेची  गोलंदाजी आरामात खेळून काढत चौथ्या विकेटसाठी 100 धावांची शतकी भागीदारी करून संघाला सावरले. धनंजयने निकोलसला  (42) पायचित करून ही जोडी फोडली. निकोलसने 78 चेंडूत 2 चौकारांसह 42 धावा काढल्या. मात्र, त्यानंतर वॉटलिंगलाही (1) धनंजयने पायचित करून न्यूझीलंडला आणखी एक धक्‍का दिला. त्यानंतर सँटेनरने (नाबाद 8) टेलरला चांगली साथ देऊन संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 24 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. 

68 षटकांचा खेळ झाला असता पावसाचे मैदानावर आगमन झाले. त्यानंतर अंधूक प्रकाश व पाऊस थांबण्याची शक्यता मावळल्याने पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.