Sat, Oct 19, 2019 04:59होमपेज › None › सेन्सेक्स 642 अंशांनी घसरला

सेन्सेक्स 642 अंशांनी घसरला

Published On: Sep 17 2019 9:13PM | Last Updated: Sep 17 2019 9:13PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार्‍या कच्च्या तेलाच्या किमती व त्याच वेळी घसरणारा रुपया या दोन्हींच्या कात्रीत भारतीय शेअर बाजार सापडलेला असून मंगळवारच्या सत्रात जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल 642 अंशांनी घसरला; तर निफ्टी 186 अंशांनी खाली कोसळले. या सत्रात प्रामुख्याने स्थावर मिळकत, वाहन उद्योग व धातू कंपन्यांची मोठी घसरण झाली.

मुंबई शेअर निर्देशांक  सकाळी 37 हजार 169.45 पातळीवर खुला झाला. त्याने दिवसभरात 37 हजार 169.45 अंशांची उच्चांकी व 36 हजार 419.09 अंशांची नीचांकी पातळी नोंदवली; मात्र बाजार बंद होताना कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात 642.22 अंशांची घसरण होऊन तो 36 हजार 481.09 अंश पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील निफ्टी निर्देशांक या सत्रात 185.90 अंशांनी खाली जाऊन 10 हजार 817.60 अंश पातळीवर बंद झाला.

हिंदुस्थान युनिलिव्हर व इन्फोसिस या कंपन्यांमध्ये या सत्रात भाववाढ झाली. तसेच टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड याकंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली. सर्वाधिक व्यवहार मारुती सुझुकी या कंपनीमध्ये झाले. तिच्या 1 लाख 19 हजार 29  शेअर्समध्ये 74  कोटी 26 लाख रुपयांचे व्यवहार झाले. या सत्रातील तिचा उच्चांकी भाव 6440 रुपये होता तर तिने दिवसभरात 6109.2 रुपयांची नीचांकी पातळी नोंदवली होती. 

उत्सुकता आणि चिंताही!

खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, ही शंका शेअर बाजाराला भेडसावते आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक बुधवारी आपले पतधोरण जाहीर करणार आहे. तसेच 20 सप्टेंबर रोजी होणार्‍या जीएसटी परिषदेत वाहन उद्योगावरील जीएसटी कमी होणार का, याविषयी उत्सुकता गुंतवणूकदारांना आहे. या कारणांमुळे सावधगिरीचा पवित्रा म्हणून शेअर बाजारात मंगळवारी विक्रीचा जोर वाढला. भारताचा विकास दर सध्या गेल्या सहा वर्षांतील नीचांकावर म्हणजे 5 टक्क्यांवर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांना खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे खीळ बसेल. तेल महागल्याने अर्थव्यवस्थेतील चालू खात्यावरील तूट वाढेल तसेच त्यामुळे वित्तीय तूटही आवाक्याबाहेर जाईल. खनिज तेलाच्या किमती मंगळवारी गेल्या चार महिन्यांतील उच्चांकावर होत्या. सोमवारीदेखील त्या 20 टक्क्यांनी वाढल्या होत्या. तेलाची ही भावातील उसळी गेल्या 30 वर्षांतील सर्वात मोठी ठरली. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.