खुशखबर! दारू सोडण्यासाठी 'एक्सिटीसी' उपयुक्त

Published On: Jul 16 2019 6:40PM | Last Updated: Jul 16 2019 6:32PM
Responsive image


वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

असे म्हणतात की, काट्याने काटा काढता येतो. व्यसनाच्या बाबतीत संशोधकांनी यावर नुकतंच शिक्कामोर्तब केलं आहे. दारू सोडवण्यासाठी एक्सिटीसी (ECSTASY) या अमली पदार्थाचा चांगला उपयोग होतो हे एका नवीन सशोधनात स्पष्ट झाले आहे. मानसोपचाराबरोबरच दोन डोस एक्सिटीसीचे दिल्यावर मोठ्या प्रमाणावर दारू पिणारे एकदमच कमी आले असे नाही, तर त्यांनी चक्क दारू सोडून दिली. चक्क दोन महिन्यात हा बदल दिसून आला असा दावा या सशोधकांनी केला आहे. 

लंडनच्या इंपिरियल कॉलेजचे संशोधक तसेच मानसिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले. डेली मेल या वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. समुपदेशनाबरोबरच या दारुड्यांना डोस देण्यात येत होते. या चाचणीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी सर्वांचीच दारू ९ महिन्यानंतर पूर्णपणे आटोक्यात आली होती. सुरुवातीला दोघांना थोडा झोपेचा त्रास झाला, मात्र नंतर त्यांनाही बरे वाटू लागले होते. 

अशा प्रकारची ही पहिलीच चाचणी होती. त्यामध्ये यशस्वी झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या चाचणीमध्ये दारू पिण्याची सवय असणाऱ्या आणि तीन मुलांची आई असणाऱ्या ५४ वर्षांच्या महिलेचा समावेश होता. 

या चाचणीत सहभागी झालेल्यांनी त्यांची दारू सुटल्याने समाधान व्यक्त केले. यातील एकाने आपले चैतन्य पुन्हा मिळाल्याचे सांगितले. तर एकाने खांद्यावरचे मोठे ओझे कमी झाल्याची भावना व्यक्त केली. जीवनातील दाट धुके दूर झाले असून आता सर्वकाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसत असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे. 

या संशोधनानंतर या प्रकारच्या उपचारामधील दुष्परिणाम मात्र अजून तपासले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बनावट औषध (प्लासिबो) चा वापर करून, तसेच मानसोपचारातून रुग्णाला बरे करता येईल का, याबाबत अधिक संशोधन सुरू असल्याचे सांगितले आहे.

उल्लेखनिय बाब म्हणजे इंग्लंडमध्ये ४ प्रौढांपैकी १ व्यक्ती धोक्याच्या पातळीच्यावर मद्य प्राषण करते. नैराश्य, मानसिक अनारोग्य याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध पातळीवर संशोधन सुरू आहे.

यापूर्वीही अशा प्रकारची संशोधने झाली आहेत. त्यामध्येही ड्रग्ज थेरपीचा स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढवण्यात उपयोग झाल्याचे समोर आले आहे. एमईएमए या ड्रग्जचा वापर सर्वसाधारणपणे नाईटक्लबमध्ये होतो. तसेच उत्सवामध्येही याचा वापर होत आहे. यामुळे आनंदी वाटते, तसेच आपुलकीची भावना वाढते असे मानण्यात येते. तसेच अनेकवेळा ज्या गोष्टीबाबत बोलणे लोक टाळतात. त्याबाबत लोक हे ड्रग्ज घेतल्यानंतर बोलू लागतात असाही अनुभव आहे.

मानसिक आजारांच्यामध्ये अनेकदा डॉक्टरांनी केटामाईन, एलएसडी, मॅजिक मश्रुम यांचा वापर केला असल्याचे सर्वश्रुत आहे. नैराश्य तसेच अतितणावानंतरच्या मानसिक विकारांच्यामध्ये याचा वापर यापूर्वी करण्यात आला आहे. 

अत्यंत अल्प प्रमाणात या ड्रग्जचा वापर करून मानसोपचारांमध्ये याचा उपयोग होत असल्याचे संशोधकांनी दाखवून दिले आहे. मात्र या प्रकारची अनेक औषधे अमेरिकेत बंदी घातलेली आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या अनेक चाचण्यांतून हे ध्वनीत होत आहे, की एकेकाळी आनंददायी अमली पदार्थ म्हणून ज्यांचा क्लबमध्ये वापर होत असे त्यांचा औषध म्हणूनही उपयोग होत आहे.

क्लब ड्रग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केटामाईनचा वापर अनेकवर्षे नैराश्यावरील उपचारांमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये झाला आहे. मार्च २०१९ मध्ये अमेरिकेच्या ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने याप्रकारच्या नाकातून ओढून घेण्याजोग्या औषधाला मान्यता दिली आहे. पारंपरिक अँटी डिप्रेसंटपेक्षा केटामाईन अधिक त्वरेने काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

मॅजिक मश्रुमचा उपयोग नैराश्य आणि पीटीएसडी अर्थात तणावग्रस्तांच्यासाठी झाला आहे. एकप्रकारे मेंदू शांत करण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील चाचणासाठीही अमेरिकेतील एफडीएने मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात मान्यता दिली आहे. 

संशोधक ड्रग्जचा वापर करून काही  विकारांच्यावर उपाय करता येईल, का याबाबत नेहमीच चाचण्या घेत असतात. या चाचण्या सर्वच वैद्यकीय कसोट्यांवर जोपर्यंत खऱ्या उतरत नाही, तोपर्यंत त्याच्या वापराने तयार झालेल्या औषधांना मान्यता, मात्र देण्यात येत नाही. तसेच या औषधांचा वापर करण्यापूर्वी योग्य ती वैद्यकीय परवानगी घेणे अनिवार्य असते.