Wed, May 27, 2020 00:05होमपेज › None › नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडररचा विजय

नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडररचा विजय

Published On: Aug 14 2019 8:55PM | Last Updated: Aug 14 2019 8:55PM
सिनसिनाटी : वृत्तसंस्था

रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकाव्हिच यांनी डब्ल्यूटीए-एटीपी सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत विजय मिळवत आगेकूच केली. तर, पाठीच्या दुखण्यामुळे सेरेना विल्यम्सने या 
स्पर्धेतून माघार घेतली.

पाठीच्या त्रासामुळे सेरेना टोरांटो डब्ल्यूटीए फायनलच्या चार गेमनंतर  माघार घेण्याचा निर्णय घेतला. सिनसिनाटीमध्ये ती पुनरागमन करेल असे वाटत होते; पण 23 वेळची ग्रँडस्लॅम विजेती असलेल्या सेरेनाला या स्पर्धेतूनदेखील माघार घ्यावी लागली. त्यामुळे 26 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या अमेरिकन ओपन स्पर्धेतील तिच्या सहभागाबाबत साशंकता आहे.

फेडररने अर्जेंटिनाच्या युआन इग्नेसियो लोंडेरोला 6-3, 6-4 असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये युआनने फेडररला चांगलेच झुंजविले. मात्र, फेडररने हा सेट जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या सेटमध्ये फेडररने युआनला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. केवळ दोन गेम गमावत फेडररने हा सेट 6-4 असा जिंकून विजयावर शिक्‍कामोर्तब करत पुढील फेरीत प्रवेश केला. 

गत चॅम्पियन जोकोव्हिच खराब सुरुवात करूनदेखील अमेरिकेच्या सॅम क्वेरीला 7-5, 6-1 असे नमविले.  पहिला सेट रोमांचक झाला. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये जोकोव्हिचने एकतर्फी विजय मिळविला. स्टॅन वावरिंकाने   ग्रिगोर दिमित्रोवला 5-7, 6-4, 7-6 असे पराभूत करीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने गतचॅम्पियन किकी बर्टन्सला 6-3, 3-6, 7-6 अशा फरकाने नमवित पुढची फेरी गाठली.