Tue, Feb 18, 2020 01:07होमपेज › None › ‘हाऊडी मोदी’ हुंकारात ह्युस्टन हाऊसफुल्ल

‘हाऊडी मोदी’ हुंकारात ह्युस्टन हाऊसफुल्ल

Published On: Sep 23 2019 12:11AM | Last Updated: Sep 23 2019 12:11AM
ह्युस्टन : वृत्तसंस्था

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियमवर स्थानिक भारतीय समुदायाने आयोजिलेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात एकत्र आले. 50 हजारांवर श्रोत्यांनी तसेच लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जगभराने हा हुंकार अनुभवला. टेक्सास प्रांतातील ह्युस्टनच्या या मैदानात पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा हे सगळे रंग अवतरलेले होते... आणि द्राविड, उत्कल, वंगही दंग झालेले होते! भाषाभेद, प्रांतभेद इथे कधीच गळालेले आहेत. ‘भारतीय’ हीच परकीय भूमीत एकमेव अस्मिता शाश्‍वत राहिली आहे. त्याचाच प्रत्यय ‘हाऊडी मोदी’तून आला.

ह्युस्टन हे भारतीयांचे अमेरिकेतील एक प्रभावक्षेत्र आहे. ऊर्जासंलग्‍न उद्योगांचे हब असलेल्या ह्युस्टनचा अमेरिकेतील राजकारणावर मोठा प्रभाव आहे, तसा ह्युस्टनमध्ये भारतीयांचा प्रचंड प्रभाव आहे. भारतीय वंशाचे अभियंतेच बहुतांशी इथल्या उद्योगाच्या जाळ्याची घट्ट वीण आहेत. भारतीय वंशाच्या डॉक्टरांचे प्रमाणही इथे लक्षणीय आहे. शहरातील निम्मेअधिक प्रतिष्ठितांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. 

‘इंडिया फोरम’ या भारतीयांच्या संस्थेने आपल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात सभेचा सोपस्कार आटोपला, असे नाही! ‘इंडिया फोरम’ने या स्टेडियममध्ये भारतीय परंपरा, भारतीय कला आणि भारतीय संस्कारांचे दर्शन घडवले. कुचीपुडी, भरतनाट्यम, गरबा, भांगडा जोशात सादर केले. स्थानिक गोरे तसेच निग्रोवंशीयांनाही या सादरीकरणातून सहभागी करून घेतले. गायक, नर्तक अशा ४०० वर कलावंतांनी आपापल्या आविष्कारांतून भारतीय महत्तेच्या प्रत्ययाला आकार दिला.

प्रेक्षकांमध्ये अर्थातच बहुतांशी भारतीयच होते. एका युवतीने सांगितले, तिचे वडील पुण्याचे आहेत. आई पंजाबी आहे. ती अमेरिकेत राहते आणि ती फक्‍त भारतीय आहे! काश्मिरी पती असलेल्या एका दुसर्‍या पंजाबी महिलेच्या प्रतिक्रियेचा सूरही असाच होता.